61 वर्षापूर्वीं प्रभात : नागपूर करार पाळू

महाराष्ट्र नाव ठरले
मुंबई, ता. 14 – मुंबई विधानसभेतील मुंबई शहर, मराठवाडा, विदर्भ व महाराष्ट्र कॉंग्रेस सदस्यांची बैठक मुख्यमंत्री ना. यशवंतराव चव्हाण यांचे घरी होऊन गुजराथ वेगळा झाल्यावर उर्वरित मुंबई राज्याचे नाव महाराष्ट्र असावे असे ठरले. विधेयकात “मुंबई राज्य’ असा उल्लेख आहे.
नागपूर करार पाळू
मुंबई – पुनर्रचनेनंतर निर्माण होणाऱ्या मुंबई राज्याचे (महाराष्ट्र) वतीने आज विधानसभेत ना. यशवंतराव चव्हाण यांनी सरकारचे धोरण विषयक निवेदन वाचून दाखविले. त्यात मुंबईचे सर्वधर्मी स्वरूप टिकवू, विदर्भ, मराठवाड्याच्या जनतेची खास गरज ओळखून उपाययोजना करू, नागपूर कराराची आश्वासने पाळू असे वचन दिले आहे.
लामांचा खजिना तिबेटातच राहिला
लंडन – तिबेटच्या लामांचा अफाट खजिना तिबेटमध्येच राहून गेला आहे, असे तिबेट-ब्रिटिश संघाचे अध्यक्ष एच. एन. बोफर्ट-पामर यांनी सांगितले.
ब्रिटनचा विषारी वायू : 8 औंसात मानवजात नष्ट होऊ शकेल
लंडन – पाश्चिमात्य युद्धविरोधी धोरणाचा भाग म्हणून, ब्रिटेनमध्ये सापडलेल्या हायड्रोजन बॉम्बपेक्षाही प्रभावी वायू उजेडात आणावयाचा असे अमेरिकन सरकारने ठरविल्याचे कळते. ह्या वायूचे उत्पादन अमेरिकेत न्यूपोर्ट (पश्चिम इंडियाना) येथे चालू आहे. हा वायू मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतो आहे हे जाहीर करण्याच्या अमेरिकन उत्सुकतेपोटी नाटो राष्ट्रात नवा पेचप्रसंग उत्पन्न होणार, असे दिसू लागले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक आणि दुसऱ्या युद्धातील जंतू युद्धाचे तज्ज्ञ डॉ. ब्रॉक चिस्होलम यांनी ब्रिटनला भेट दिली. तेव्हा जाहीर केले की, घटसर्पाचे विषाणू प्रयोगशाळेत बनवून इतर जंतूविष प्रतिबंधकता मारून टाकणे शक्य आहे. बोटूलिनस टॉक्सिन इतके महाभयंकर विष आहे की, अवघ्या 8 औंसात सर्व मानवजातीचा विध्वंस होईल.





