46 वर्षांपू्र्वी प्रभात : अहमदनगरजवळही आता जुळ्या नगरची उभारणी

अहमदनगरजवळही आता जुळ्या नगरची उभारणी
अहमदनगर, दि. 18 – विद्यमान शहरालगत एक नवी नगरी बसविण्याची योजना असून तिला “नवे अहमदनगर’ असे नाव देण्यात येईल. या उभारणीसाठी सहा कोटी रुपये खर्च येईल. सध्याचे नगर शहर व औरंगाबाद-मनमाड रस्त्यावरील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विभाग यांच्या मधोमध ही नगरी वसविली जाईल.
नव्या नगरीत शाळा, रुग्णालये, बगीचे व उद्याने यांची तरतूद आहे. मध्यम व अल्प उत्पन्नाच्या गटांच्या लोकांसाठी 300 सहकारी घरबांधणी संस्थाची घरे उभारली जातील. अशी ही योजना प्रस्तावित आहे.
धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास झटले पाहिजे
पुणे – ज्यांच्या त्यागातून धरण उभे राहते त्या धरणग्रस्तांच्या दुःखाची जाणीव थोड्याच कालावधीत ज्यांना धरणापासून फायदा मिळतो ते व कार्यकर्ते आणि अधिकारी सर्वचजण सोयीस्कररित्या विसरतात.
धरणाच्या कामाला गती कशी येईल हे पाहात असतानाच धरणग्रस्तांचे जिव्हाळ्याचे प्रश्न हे आपले स्वतःचे प्रश्न समजून पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते व अधिकारी यांनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नेटाने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आज येथे बोलताना केले.





