पुस्तक परीक्षण : आयदान

-माधुरी तळवलकर

दलित साहित्यात अनेक आत्मकथने प्रसिद्ध झाली. त्यातली बरीचशी पुरुषांनी लिहिलेली आहेत. मुळात आपल्या समाजात स्त्रीला दुय्यम स्थान. त्यात दलितांमधली स्त्री, तिच्या वाट्याला काय भोग आले असतील? जातीपातीच्या कुंपणांना भेदून ही स्त्री शिकली-सवरली, तेव्हा तिची मानसिक आणि बौद्धिक जडणघडण कशी होत गेली? उर्मिला पवार यांनी “आयदान’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यातून अशा अनेक गोष्टींवर प्रकाश पडतो.

प्लॅस्टिकचं युग येण्यापूर्वी बांबूपासून तयार केलेली सुपं, रोवळ्या, परड्या, हारे, करंडे इत्यादी वस्तूंना महत्त्व होतं. या सगळ्या वस्तूंना आयदान किंवा आवतं म्हणतात. कोकणाबाहेर बुरूड नावाच्या भटक्‍या विमुक्‍त जातींचा पोट भरण्याचा हा व्यवसाय आहे. कोकणात हा व्यवसाय अनुसूचित जातींच्या यादीत असलेल्या महार या जातीकडे होता.

‘आयदान’ या पुस्तकाच्या पुष्कळ आवृत्त्या निघाल्या. कशामुळं हे पुस्तक एवढं लोकप्रिय झालं? कारण या आत्मचरित्रात व्यक्‍त झालेले अनोखे अनुभव आणि लेखिकेची प्रसन्न शैली! शाळेत हिलाच शेण काढायचे काम देणारे मास्तर असोत किंवा उपाशीपोटी समुद्रावर जाऊन जिवावर उदार होऊन माळवं शोधणाऱ्या बायका असोत; कुठलेही अनुभव लेखिका अगदी आत्मीयतेने रंगवते. जीवन जसे समोर आले तसे लेखिका त्याला भिडत गेली आणि त्यामुळेच हे पुस्तक सहजपणे आवडून जाते. लहान शाळेतून लेखिका जसजशी मोठ्या शाळेत जाऊ लागली, तसतसे तिचे अनुभवविश्‍व विस्तारू लागले.

त्यांच्याकडची लग्नं, वराती, जेवण… सगळं त्या यात सविस्तर लिहितात. एकदा ती एका लग्नात चक्‍क “शर आला तो धावुनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ’ ही कविता तालासुरात म्हणते. नात्यातली एक म्हातारी म्हणते, “गान्यात नवऱ्याचं नाव घालून तरी गानं म्हन.’ तेव्हा ही खुशाल “शर आला तो धावुनी आला काळ, विव्हळला जनार्दन बाळ’ अस गाणं म्हणून सगळ्यांच्या टाळ्या मिळवते. गाण्यातल्या शब्दांचे अर्थ कुणालाच कळलेले नव्हते!

उर्मिला पवार यांच्या कथा छापून येण्यास सुरुवात झाल्यावर सर्वच लेखकांप्रमाणे याही हुरळून गेल्या. आपण लिहितो, म्हणजे आपण फारच ग्रेट, असं लेखकाला सुरुवातीच्या काळात वाटत असतं. त्या नादात लेखिकेची एका चांगल्या पण मितभाषी लेखकाशी बोलताना कशी फजिती झाली, हेही त्या मोकळेपणानं सांगतात. ही त्याला, “लिही, लिहीत राहा, आपण बघू कुठं छापता येतं ते…’ असं प्रोत्साहनपर बोलते. त्यानंतर हा लेखक शांतपणे अगदी प्रतिष्ठित मासिकात त्याच्या कथाकविता आधीच प्रकाशित झालेल्या असल्याचं मोठ्या विनम्रपणे सांगतो. हा प्रसंग वाचताना, आपल्यालाही अज्ञानातून झालेले आपले घोटाळे आठवतात आणि आपण लेखकाच्या अधिक जवळ जातो.

पुढे उर्मिला पवार यांचे वाचन, लेखन, अभ्यास वाढला. दलितमुक्‍ती चळवळ, स्त्रीउवाच या संघटनेत त्यांचा सहभाग वाढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, वगैरे निमित्ताने त्यांची भाषणं होऊ लागली. त्यात येणारे भलेबुरे अनुभव त्यांनी लिहिले आहेत. त्यामुळे एक सामाजिक दस्तावेज म्हणूनदेखील या पुस्तकाचे महत्त्व आहे.

मूळचा उदार, उमदा असलेला त्यांचा पतीही शेवटी या पुरुषप्रधान समाजाचाच भाग होता. कधी कधी त्याचे चटकेही उर्मिला पवार यांना सोसावे लागले. त्याविषयीही यात त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे. वेगवेगळ्या अनुभवांवर मराठीत पुस्तके यायला हवीत. मात्र, त्यासाठी वेगळ्या समाजातल्या, वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी लिहायला हवं. हे पुस्तक या प्रकारचं असल्यामुळे अजून ते वाचलं नसल्यास नक्कीच वाचायला हवं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)