टोकियो (जपान) – जपानच्या उत्तरेकडील भागाला आज भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. एकापाठोपाठ अनेक धक्के जाणवल्याचे जपानच्या भूगर्भशास्त्र केंद्राने म्हटले आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे त्सुनामी लाटा उसळण्याचा इशाराही देण्यात आला आहे. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता ६.७ मॅग्निट्युड इतकी होती आणि इवाटे जिल्ह्याच्या भागाला हे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्राखाली १० किलोमीटरवर होता. पण या भूकंपामुळे कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. तसेच भूकंपामुळे या परिसरात असलेल्या दोन अणूभट्ट्यांचे कोणतेही नुकसान झाल्याचेही वृत्त नाही. भूगर्भशास्त्रीय केंद्रानेएक मीटर उंचीच्या त्सुनामी लाटा उसळण्याचा इशारा दिला गेला होता. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर तासाभरापर्यंत हा इशारा लागू होता. त्यानुसार नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांपासून दूर रहावे, असा सावधानतेचा इशारा सरकारी वृत्तवाहिनीवरून देण्यात आला होता. परिसरात आणखी भूकंपाचे धक्के जाणवण्याचा इशाराही देण्यात आला होता. इवाटे जिल्ह्यातल्या ओफुनातो शहरात १० सेंटीमीटर इतक्या उंचीच्या त्सुनामी लाटा आल्याचे बघितले गेले. भूकंपामुळे बुलेट ट्रेनदेखील उशीराने धावत होती. तर काही भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाल्याचेही वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. जपान हा भूकंपप्रवण क्षेत्रावर असल्याने तेथे नेहमीच कमी अधिक क्षमतेचे भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मार्च २०११ मध्ये भूकंपानंतर आलेल्या त्सुनामी लाटांमुळे जपानमध्ये मोठे नुकसान केले होते.