मजूर टंचाईचा प्रश्न ऐरणीवर! लाडकी बहीण योजनेचाही शेतकामांवर काहीसा परिणाम

नगर – दिवाळीचा सण तोंडावर आल्याने शेती कामांना वेग आला आहे. मजुरांची समस्या पुन्हा निर्माण होत आहे. शासनाच्या लाडकी बहीण योजनेमुळे शेत शिवारात वेगळीच अडचण निर्माण झाली आहे. महिला शेतमजूर नोंदणीपासून ते जमा झालेले पैसे काढण्यापर्यंत व्यस्त असल्याने शेतीकामाला दांडी मारत आहेत. परिणामी शेतकर्यांना मजुरांची शोधाशोध करावी लागत आहे.
शेतात कापूस, तूर, मूग, ज्वारी आदी काढणीचे काम सुरु आहे. बाजरी कापणी केली जात आहे. डाळींबासह फळबागांमध्ये मजुरांना काम मिळत आहे. ऐन सणाच्या तोंडावर मजुरांची संख्याही जाणवू लागली आहे. परिणामी शेतीची कामे खोळंबत आहेत. शासनाच्या मोफत धान्य, महिलांना साडी वाटप, एस. टी. भाडे सवलत, लाडकी बहिण आदी योजनांमुळे महिला मजुर कामाला येण्यास धजावत नसल्याचे शेतकर्यांकडून सांगितले जाते.
महिला बँकेच्या रांगेत लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची सर्वच बँकांमध्ये गर्दी होत आहे. पैसे काढण्यासाठी एकच झुंबड गावांबरोबर नजीकच्या शहरातही उडत आहे. यामुळे शेतीकामापेक्षा याच कामाला प्राधान्य दिले जात असल्याने सध्या सर्वत्र मजुर टंचाई आहे. पुरुषांना 400 ते 500 रुपये तर महिलांना 250 ते 300 रुपये रोजंदारी मिळत आहे. गेल्या महिन्यापासून यात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यातही मजुरांना ने-आण करण्यासाठी शेतकर्यांना स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करावी लागत आहे.़
मका, बाजरी कापणी करणे, शेतातील गवत साफ करणे आदी कामे सुरु आहेत. शेतातील मका व बाजरीचा कडबा आवरला जात आहे. कांदा काढणीचे काम देखील सुरु आहे. गेल्या आठ दिवसांपासून महिला मजूर शेतकामासाठी येण्यास राजी नाहीत. बँकेची कामे वेळेत होत नसल्याने येवू शकत नसल्याचे कारण दिले जात आहे.
– रामा घनवट,
शेतकरी,





