Chakan MIDC – जागतिक स्तरावरील इराण-अमेरिका संघर्षाचा परिणाम आता पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील औद्योगिक क्षेत्रावर दिसू लागला आहे. इंधन दरवाढ, एलपीजी गॅसचा तुटवडा आणि वाढत्या महागाईमुळे परप्रांतीय कामगारांनी आपल्या मूळ गावी परतण्यास सुरुवात केली आहे. या मोठ्या स्थलांतरामुळे चाकण औद्योगिक क्षेत्रात सध्या ३० ते ४० टक्के कामगारांची कमतरता भासू लागली असून, उत्पादन प्रक्रियेवर त्याचे थेट परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत घरगुती गॅस सिलेंडरचे दर ९०० रुपयांवरून थेट २००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर कमर्शियल गॅस ४००० रुपयांवर गेला आहे. गॅसच्या टंचाईमुळे काळाबाजार वाढला असून प्रतिकिलो गॅससाठी ५०० ते ७०० रुपये मोजावे लागत आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांची दिवसाची कमाई केवळ स्वयंपाकाच्या इंधनावर खर्च होत असल्याने उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड येथील कामगारांनी परतीची वाट धरली आहे. उद्योजक अभिमन्यू शेलार यांनी सांगितले की, कामगार उपलब्ध नसल्याने उत्पादनावर परिणाम होत असून शासनाने दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. कामगारांच्या या संकटामुळे अनेक कंपन्यांमधील कँटीन सेवा बंद पडल्या आहेत, तर इंधन दरवाढीमुळे कंपनी बस सेवांमध्येही कपात करण्यात आली आहे. यामुळे कामगारांचा प्रवास खर्च वाढला असून, त्यांची अन्नाचीही गैरसोय होत आहे. उत्पादन क्षेत्रातील कामासाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय मर्यादित असल्याने कारखानदारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीची दखल घेऊन कामगारांना सुविधा द्याव्यात आणि दीर्घकालीन धोरण आखावे, अशी मागणी तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.