E Challan Cyber Scam: सावधान! ‘ई-चलन’ ठरतंय सायबर चोरट्यांचं नवं हत्यार; मेसेजमधील ‘ती’ एक चूक अन् बँक खातं होणार रिकामं
E Challan Cyber Scam: थकीत चलनाचे बनावट मेसेज पाठवून मालवेअरद्वारे मोबाईल हॅक; आळंदीतील व्यक्तीची तब्बल ४ लाखांची फसवणूक.

E Challan Cyber Scam – पिंपरी-चिंचवडसह देशभरात ई-चलन यंत्रणा सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीचे नवे हत्यार ठरू लागली आहे. ई चलन पडले असल्याचे संदेश पाठवून भरणा करण्याचे संदेश पाठवले जातात. मालवेअराचा वापर करत थकीत चलन भरण्याच्या नावाखाली बनावट संदेश पाठवून नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नुकतीच आळंदी येथे राहणार्या व्यक्तीची सुमारे ४ लाखांची फसवणूक करण्यात आली होती. हा प्रकार केवळ शहरापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशभरात ही पद्धत वापरण्यात येत असल्याचे चित्र आहे.
परिणामी, पिंपरी-चिंचवड परिवहन विभागाने (आरटीओ) नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “तुमचे ई-चलन प्रलंबित आहे”, “दंड न भरल्यास लायसन्स रद्द होईल” असे सरकारी यंत्रणेसारखे वाटणारे मेसेज सायबर चोरटे व्हॉट्सॲप आणि एसएमएसद्वारे पाठवतात. या संदेशात एक बनावट लिंक जोडलेली असते. ही लिंक उघडताच नागरिक एका बनावट वेबसाईटवर पोहोचतात किंवा मोबाईलमध्ये संशयास्पद ‘APK’ फाइल डाऊनलोड करायला लावली जाते.
या मालवेअरद्वारे मोबाइलचा ताबा ऑनलाइन पद्धतीने सायबर गुन्हेगारांकडे जातो. जर मोबाईलमध्ये बँकेचे ॲप असेल, तर अवघ्या काही क्षणात बँक खात्यातील तपशील, ओटीपी आणि संवेदनशील माहिती चोरून सर्व पैसे इतर खात्यांमध्ये (म्युल अकांऊट) वळवले जातात. अनेकदा नागरिकांना फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत खात्यातील पैसे गायब झालेले असतात.
दरम्यान, राज्यभरात सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नुकतीच बँकॉकहून एका सायबर गुन्हेगाराला अटक केली आहे. याच पद्धतीने एका व्यक्तीला बनावट ई-चलन संदेश पाठवून तब्बल ४ लाख ७६ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. तर मावळ परिसरात एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची बनावट वीज बिल भरण्याच्या लिंकद्वारे १ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
फसवणूक झाल्यास त्वरित काय कराल?
जर तुमच्यासोबत अशी आर्थिक फसवणूक झाली, तर अजिबात वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलच्या १९३० (1930) या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या जिल्हा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.
“परिवहन विभाग किंवा आरटीओ कार्यालय नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक व्हॉट्सॲप किंवा एसएमएसवर पेमेंट लिंक पाठवत नाही. नागरिकांनी लायसन्स किंवा ई-चलन संबंधित कामांसाठी केवळ केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा.”
– राहुल जाधव, पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी





