Cyber Crime – इंस्टाग्रामवर ओळख वाढवत महागडा मोबाईल भेट देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका 26 वर्षीय तरुणीची तब्बल 11 लाख 51 हजार 900 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणी संगणक प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण घेत आहे. 5 डिसेंबर 2025 रोजी तिच्या इंस्टाग्राम आयडीवर ‘विकास शर्मा’ नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. सुरुवातीला साध्या गप्पांमधून ओळख वाढवत त्याने विश्वास संपादन केला. काही दिवसांनी स्वतः इंग्लंडमध्ये रेस्टॉरंट व्यवसाय करणारा भारतीय असल्याचे सांगत मैत्रीच्या नावाखाली ‘आयफोन 17 प्रो मॅक्स’ भेट देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पार्सल पाठवले असल्याचे सांगून स्वतःला मुंबई विमानतळावरील कस्टम अधिकारी असल्याचे भासवणार्या दुसर्या व्यक्तीकडून तरुणीला फोन आला. कस्टम शुल्क, एक्स्चेंज फी, परमिशन लेटर, इनकम टॅक्स, कॅश शो मनी अशा विविध कारणांखाली तिच्याकडून वारंवार पैसे भरून घेतले गेले. इतकेच नव्हे तर स्वतःला सीबीआय अधिकारी आणि आरबीआय मॅनेजर असल्याचे सांगत तिच्या करिअरचा नाश करण्याची व कुटुंबावर कारवाई करण्याची धमकी देण्यात आली. या भीतीमुळे 13 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत संबंधित तरुणीने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये व यूपीआय आयडीवर एकूण 11 लाख 51 हजार 900 रुपये पाठवले. नंतर संशय आल्यावर तिने पैसे परत मागितले असता आरोपींनी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार नोंदवली. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.पोलीस प्रशासनाने नागरिकांना सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार टाळण्याचे तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.