Pune RTO: नोकरदारांनो, रिक्षा परवाने जमा करा, अन्यथा… राज्य परिवहन विभागाचा कारवाईचा इशारा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत किंवा इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करताय आणि तुमच्याकडे रिक्षा परवाना असेल तर तात्काळ रिक्षा परवाना स्वेच्छेने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करावा. अन्यथा मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.शहराच्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे नागरिकांच्या सोईसाठी राज्य परिवहन विभागाकडून खासगी वाहतुकीसाठी रिक्षाला परमीट दिले जाते. मोटार व्हेईकल ॲक्टनुसार हे परवाने दिले जातात. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रिक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर आरटीओने २०१७ मध्ये नवीन रिक्षांना परवाने देण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे अनेकांना व्यवसाय मिळाला. अनेकांनी रिक्षा घेऊन परवाने घेतले. त्यामुळे रिक्षांमध्येही स्पर्धा निर्माण झाली.
शहरात सध्या ८३ हजारांपेक्षा जास्त रिक्षा परवाने आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये ४० हजारहून अधिक रिक्षा परवाने दिले आहेत. शहरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.मोटार वाहन कायद्यानुसार ऑटोरिक्षा परवाना देताना संबंधित व्यक्ती सरकारी, निमसरकारी,खासगी कंपनीत किंवा इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करत नसावा ही अट आहे. रिक्षा परवाना देताना संबंधित व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात येते.
शहरात काही जण नोकरी करून बाकी वेळेत रिक्षा चालवित असल्याच्या तक्रारी येत आहेत. रिक्षा परवाना घेतल्यानंतर नोकरी मिळाल्यास त्या व्यक्तींनी रिक्षा परवाना स्वच्छेने परत करणे आवश्यक आहे. मात्र, अनेकजण याकडे दुर्लक्ष करत सर्रासपणे रिक्षा व्यवसाय करतात.
एखाद्या कंपनीत आठ तास काम केल्यानंतर अन्य वेळेत आणि सुट्टीच्या दिवशी रिक्षा चालवितात. यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागतो. आता, नोकरदार रिक्षा परवानाधारकांवर कारवाई होणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.
“रिक्षा परवाना घेताना तो कोठेही नोकरी करत नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिलेले असते. परवाना घेतल्यानंतर नोकरी मिळाल्यास त्याने रिक्षा परवाना परत करणे आवश्यक आहे. नोकरी करत असलेल्या व्यक्तींनी त्यांच्याकडील रिक्षा परवाना तात्काळ जमा करावा.”
– स्वप्निल भोसले,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे





