Duleep Trophy Semifinals : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट! ईस्ट झोनची गाठ बलाढ्य सेंट्रल झोनशी; वैभव अन् रजतवर सर्वांच्या नजरा
Duleep Trophy Semifinals : या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चारही संघ निश्चित झाले आहेत, ज्यापैकी एका सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि रजत पाटीदार आमनेसामने येणार आहेत.

Duleep Trophy 2026 Semifinals Schedule East Zone vs Central Zone : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील अत्यंत प्रतिष्ठित आणि मानाच्या दुलीप करंडक २०२६ (Duleep Trophy 2026) स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामने नुकतेच पार पडले आहेत. या रोमांचक लढतींनंतर आता स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे (Semifinals) चारही संघ निश्चित झाले आहेत. २३ ऑगस्टपासून खेळल्या गेलेल्या सामन्यांत ईस्ट झोनने नॉर्थ ईस्ट झोनचा तब्बल एक डाव आणि २१० धावांनी धुव्वा उडवत आगेकूच केली. तर दुसऱ्या सामन्यात नॉर्थ झोनने कडवी झुंज देत वेस्ट झोनचा ५२ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.
इशान किशनच्या नेतृत्वाखाली ईस्ट झोन मैदानात; रजत पाटीदारच्या संघाचे आव्हान!
पहिला उपांत्य सामना ३० ऑगस्टपासून ईस्ट झोन आणि गतविजेत्या सेंट्रल झोन यांच्यात रंगणार आहे. बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सच्या ग्राउंड-१ वर सकाळी ९:३० वाजता या लढतीला सुरुवात होईल. ईस्ट झोनचे कर्णधारपद ईशान किशन सांभाळत असून, त्यांच्यासमोर रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील बलाढ्य सेंट्रल झोनचे तगडे आव्हान असेल. सेंट्रल झोनच्या संघात रिंकू सिंग आणि हर्ष दुबे यांसारख्या मॅचविनर खेळाडूंचा भरणा आहे.
‘वंडर बॉय’ वैभव सूर्यवंशीकडून फलंदाजीत मोठ्या खेळीची अपेक्षा!
The Semi-Final line-up is Locked! 🔒🏏
Get ready for some more exhilarating action starting August 30 💥#DuleepTrophy pic.twitter.com/KJPlkingEb
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 26, 2026
उपांत्यपूर्व फेरीत नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध अवघ्या एका डावात फलंदाजीची संधी मिळालेला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी ६ चेंडूंत ८ धावा करून बाद झाला होता. मात्र, फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतर त्याने चक्क ४ चेंडूंत २ बळी टिपत गोलंदाजीत सर्वांना चकित केले होते. आता सेमीफायनलच्या मोठ्या मंचावर वैभव लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीचा जलवा दाखवणार का, याकडे संपूर्ण क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दुसऱ्या उपांत्य फेरीत नॉर्थ झोन आणि साउथ झोन आमनेसामने!
स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना ३० ऑगस्टपासूनच बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सच्या ग्राउंड-२ वर खेळवला जाईल. या सामन्यात तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील साउथ झोनचा सामना नॉर्थ झोनविरुद्ध होईल. साउथ झोनच्या संघात नारायण जगदीशन आणि अनुभवी करुण नायर यांचा समावेश असल्याने दोन्ही संघांमध्ये अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे.





