Duleep Trophy 2024 (IND A vs IND B) : ज्या खेळपट्टीवर पंत, यशस्वी आणि सरफराज ठरले अपयशी, तिथे 19 वर्षांच्या मुलानं झळकावले शतक…

Duleep Trophy 2024 (IND A vs IND B) : भारताचा देशांतर्गत क्रिकेट हंगाम दुलीप ट्रॉफी सुरू झाली आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये भारत अ संघाचा सामना भारत ब बरोबर (IND A vs IND B) सुरू आहे. हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत-ब संघाने सात गडी गमावून 202 धावा केल्या होत्या.
भारत ‘अ’ संघाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकली आणि भारत ‘ब’ला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. एकवेळ भारत ‘ब’ संघाने 94 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर 19 वर्षीय मुशीर खानने (Musheer Khan) नवदीप सैनीसह 108 धावांची भागीदारी करत संघाला 200 च्या पुढे नेले.
ज्या खेळपट्टीवर यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, सरफराज खान आणि ऋषभ पंत सारखे दिग्गज फलंदाजीत अपयशी ठरले, तिथे 19 वर्षीय मुशीरने आपल्या संयमी फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. मुशीर अद्याप 227 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 105 धावा करत खेळपट्टीवर आहे. मुशीर हा सरफराजचा धाकटा भाऊ आहे.
Musheer Masterclass 👌👌
Musheer Khan headlined India B’s fight against India A with a superb century. He’s unbeaten on 105 at the end of the day’s play.
Re-live some of his delightful strokes 🔽
Follow the match ▶️ https://t.co/eQyu38Erb1 pic.twitter.com/91UPakOr0c
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 5, 2024
भारत अ विरुद्ध भारत ब सामन्यात, अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील भारत ब संघाने प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत या संघाने सात गडी गमावून 202 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल 30 धावा करून बाद झाला तर कर्णधार ईश्वरन 13 धावा करून बाद झाला. तर सरफराज खानला नऊ धावा करता आल्या. बराच काळ लाल चेंडूचा फॉरमॅट खेळणारा ऋषभ पंतही सात धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खातेही उघडता आले नाही. आर साई किशोर एक धाव काढून बाद झाला. भारत ब संघ अडचणीत असल्याचे दिसत होते, परंतु मुशीरने सैनीसह संघाला केवळ संकटातून बाहेर काढले नाही तर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. भारत-अ संघाकडून खलील अहमद, आकाश दीप आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दरम्यान,दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरू झाली आहे. लाल चेंडूने खेळली जाणारी ही दीर्घ स्वरूपाची स्पर्धा आगामी कसोटी वेळापत्रकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आगामी काळात भारताला 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. यामध्ये या महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेचाही समावेश आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडू सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी दुलीप करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. या स्पर्धेत गुरुवारी दोन सामने सुरू झाले. यामध्ये भारत ‘अ’ विरुद्ध भारत ‘ब’ आणि भारत ‘क’ विरुद्ध भारत ‘ड’ या सामन्यांचा समावेश आहे.





