अभ्यासाच्या ताण तणावामुळे तिने सोडले घर

पुणे – एक अवघी दहा वर्षांची मुलगी अभ्यासाचा आणि खेळामध्ये पालकांनी दाखवलेल्या अवास्तव अपेक्षांचा ताण घेऊन शाळेतून परस्पर निघून गेली. पोलिसांनी तिला मोठ्या मुश्किलीने शोधून काढले. मात्र, पालक समोर दिसताच ती तासभर पोलिसांच्या कुशीत लपून बसली. ती कोणत्याही परिस्थितीत पालकांकडे जाण्यास तयार नव्हती. अभ्यासातील ताणामुळे तीने स्वाध्वी बनण्यासाठी घर सोडले होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लष्कर परिसरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयातून मुलगी घरी परतली नाही. पालकांनी शोधाशोध केल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. परिसरातील 20 ते 25 सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ती एका रिक्षा चालकाशी बोलताना दिसली. पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला असता ती कॅब करुन ठाण्याला गेल्याचे समजले.
पोलिसांनी तब्बल 50 फोन नंबर धुंडाळून कॅब चालकाशी संपर्क साधण्याला. तो ठाण्यात पोहचला होता. तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात मुलीला नेण्यास पोलिसांनी त्याला सांगितले. यानंतर बंडगार्डन पोलिसांचे पथक मुलीला सुखरुप पुण्यात घेऊन आले. तीची विचारपूस केली असता अभ्यासाचा अवास्तव ताण आल्याचे तीने सांगितले. ती स्वीमिंगमध्ये राज्य स्तरावरील खेळाडू आहे.
यातही तीला सातत्याने चांगली कामगिरी दाखवण्यासाठी दबाव टाकला जात होता. तीची आत्या स्वाध्वी असून ती ठाण्यात असते. यामुळे तीलाही आत्यासारखे स्वाध्वी बनायचे होते. मात्र, ठाण्यात गेल्यावर तीला आत्याचे घर सापडले नाही. त्याच दरम्यान बंडगार्डन पोलिसांनी कॅब चालकाशी संपर्क साधला होता. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक रवी गावडे, चेतन धनवडे, अंमलदार ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांच्या पथकाने केली.
“मुलीचे अभ्यासाचे वेळापत्रक खूपच व्यस्त होते. याचा तीने मोठा ताण घेतला होता. या ताणातून तीने शाळा सुटताच ठाणे गाठले. तीथे जाऊन तीला आत्यासारखे स्वाध्वी बनायचे होते” – स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन





