Nagar | माजी महसूलमंत्र्यांमुळेच आकार पडितांचा प्रश्न प्रलंबित- दीपक पटारे

श्रीरामपूर, (प्रतिनिधी) – अगोदरच्या महसूलमंत्र्यांनी जमिनी वाटपाबाबत घेतलेल्या नकारात्मक भूमिकेमुळे आकारी पडितांचा प्रश्न प्रलंबित होता. परंतु, महसूलमंत्री होताच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा प्रश्न सुटण्यासाठी अनेकदा वकील आणि अधिकाऱ्यांच्या मिनी मॅरेथॉन बैठका घेत कायद्याचा किस काढला.
त्याचे आपण स्वतः साक्षीदार आहोत नव्हेतर ना. विखेंनी अकारी पडीत शेतकऱ्यांना जमिनी १०० टक्के देण्याची घेतलेली भूमिका आणि त्यासाठी न्यायालयात सरकारच्या वतीने सकारात्मकता दाखवल्याने अकारी पडीत शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी व्यक्त केली आहे.
पटारे म्हणाले की, यापूर्वी अनेक महसूलमंत्री होवून गेले परंतु, कोणी या प्रश्नात जातीने लक्ष घातले नाही. पद्मभूषण स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून अकारी पडीतांचा प्रश्न सोडवण्यासाठी विखे कुटूंबीय प्रयत्नशिल होते.
यापूर्वीचे महसूलमंत्री असणारे बाळासाहेब थोरात यांच्याकडे अनेकदा अकारी पडीत शेतकरी शिष्टमंडळ घेऊन गेले. परंतु, त्यांनी आश्वासनाच्या पलीकडे काही दिले नाही.
उलटपक्षी शेतकऱ्यांबाबत सकारात्मकता दाखवण्याऐवजी न्यायालयात सरकारच्यावतीने ‘या जमिनी देता येणार नाही’, असे प्रतिज्ञापत्र दिल्याने या जमिनी मिळतील की नाही, अशी शंका निर्माण झाली होती.
मात्र, या जमिनी वाटपामध्ये ज्या-ज्या कायदेशीर अडचणी आहेत, त्याची सोडवणूक करण्यासाठी मंत्री विखे यांनी मुंबईत वकील आणि अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेतल्या.
त्याला आपण स्वतः उपस्थित होतो. एवढेच नव्हेतर औरंगाबाद उच्च न्यायालयात सरकारचे नकारात्मक असणारे प्रतिज्ञापत्र मागे घेऊन सरकार अकारीपडीत जमिनी द्यायला सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता सरकारच्या सकारात्मकतेमुळे जमिनी वाटपात कोणतीच अडचण राहिली नाही.
न्यायालयाने ८ आठवड्यात जमिनी वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने आता १०४ वर्षांपासून प्रलंबित असलेला अकारी पडीतचा प्रश्न मार्गी लागला असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जमिनी मिळणार आहेत,
याचे संपूर्ण श्रेय हे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाच असल्याचे पटारे यांनी सांगितले. पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांची यानिमित्ताने अकारी पडीत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत देण्याची स्वप्नपूर्ती झाली आहे.





