पिंपरी | वाढीव बांधकामे, अतिक्रमण, रिक्षा थांब्यामुळे कोडतोय चौकाचा श्वास

पिंपरी, (प्रतिनिधी) – काळेवाडी येथील पंचनाथ चौकाला अतिक्रमणाचा विळखा पडला असून त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. वर्षानुवर्षांच्या या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाला आहेत. महापालिका प्रशासन मात्र, याकडे दुर्लक्ष करत असून पंचनाथ चौक कधी मोकळा श्वास घेणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
काळेवाडी व पिंपरी मुख्य रस्त्यावरील हा प्रमुख चौक आहे. या चौकातून नढेनगर, ज्योतिबानगर, राजवाडेनगर, कोकणेनगर आदी भागाला जोडणारे रस्ते जातात. त्यामुळे या चौकात कायमच वर्दळ असते. सतत वाहनांची ये-जा असते. मात्र, चौकातील दुकानदारांनी वाढीव बांधकामे केली असून त्यांचे साहित्य व ग्राहकांची वाहने रस्त्यावर लावलेली असतात.
त्यामुळे या चौकातील रस्ते अतिक्रमणांनी अरुंद झाले आहेत. सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होतात. येथून गावठाणात असलेल्या महापालिकेच्या शाळेला रस्ता आहे.
शालेय विद्यार्थी या चौकातून ये-जा करत असतात, त्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. ही समस्या मागील अनेक वर्षापासून असून महापालिका प्रशासन यावर कोणत्याच उपाययोजना करत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.
चौकात रिक्षा थांबा
याच चौकात रिक्षा थांबा उभारण्यात आला असून पिंपरीकडून येणाऱ्या रिक्षा व पिंपरीकडे जाणाऱ्या रिक्षा याच चौकात थांबत असतात. तसेच, अनेकदा भर चौकात रिक्षा चालक प्रवाशांची वाट पाहत असतात. त्यामुळे सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सर्व बाजूंची वाहने पुढे जाण्याच्या प्रयत्न करतात, त्यामुळे पिंपरी व एमएम चौकाच्या बाजूला लांबपर्यंत रांगा लागतात.
आझाद कॉलनी एक, दोन, तीन व गावठाणला चौकातून एकमेव रस्ता आहे. या चौकात मोठ्या प्रमाणात वाढीव बांधकामे झाली असून पायऱ्याही रस्त्यावर आल्या आहेत. त्यांच्या पुढे गाड्या लावल्या जातात. आता फक्त १० ते १२ फुट रस्ता राहिला असून त्यावरही दोन्ही बाजूंनी वाहने लावलेली असतात.
त्यामुळे येथून फोर व्हिलर काय टू व्हीलरलाही जाता येत नाही. काही वर्षांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी या चौकाची व आतमध्ये जाणाऱ्या कॉलनी रस्त्यांची पाहणी केली असता, येथील अतिक्रमणे हटवून रस्ता २० फूट करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, पुढे काहीच झाले नाही. – हनमंत सुतार, स्थानिक नागरिक





