Pune District : राजगुरूनरातील अतिक्रमणांवर पुन्हा हातोडा

वाडा रस्त्यावरील पथारीधारकांवर नगरपरिषदेकडून कारवाई
राजगुरूनगर – शहरात पथारीधारकांवर नगरपरिषदेकडून गुरुवारी (दि. 10) पुन्हा कारवाई करण्यात आली.
राजगुरूनगर शहरातील मुख्य वाडा रस्त्याचे सिमेंट क्राँक्रीटकरण झाले आहे. नगरपरीषदेच्यावतीने काँक्रीटीकरणाच्या दोन्ही बाजुने काही भागात पदपथ तर काही भागात सिमेंट ब्लाँक टाकुन सुशोभीकरण केले आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूकडून हात विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी या पदपथावर चक्क मालकी जागेसारखे अतिक्रमणे केली आहेत.
रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदार यांनी पदपथावर झाडांच्या कुंड्या, स्टॉल लावुन अतिक्रमणे केली आहेत. काही दुकानदारांनी रस्त्यावर चिरे रोवले असून स्वतःची मालकी सिद्ध केली आहे. त्यामुळे पादचार्यांना चक्क रस्त्यावरुन चालण्याची नामुष्की आली आहे. शहरात नगरपरिषदेच्या वतीने मुख्य रस्ते आणि मोक्याच्या जागेवर रंगरंगोटी करून संदेश देणार्या वाक्यांनी भिंती रंगवण्यात आल्या आहेत; मात्र त्यावर अनाधिकृत फ्लेक्स लावण्यात येत असुन त्याचे विद्रुपीकरण होत आहे.
याविरोधात नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी आज ठोस भूमिका घेत पुन्हा दुसं-यादा अतिक्रमण हटवली. वाडा रस्त्यावर एलआयसी परीसरात चक्क पदपथावर स्नँक्स सेंटर दुकान थाटण्यात आल्याचे पहावयास मिळाले. भाजीपाला व्यवसायिकांनी खिळे ठोकुन ताडपत्री लावण्यात येऊन पेव्हर ब्लॉक उखडल्याचे पहावयास मिळाले.





