नेवासा फाट्यावरील अतिक्रमणांवर पाटबंधारे विभागाचा हातोडा; दुकाने भुईसपाट

नेवासा : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या नेवासा फाटा येथील मुळा पाटबंधारे खात्याच्या चाऱ्यांवरील अतिक्रमणांवर अखेर कठोर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी (दि. ३० मे) सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेल्या या मोहिमेत पोलिस उपाधीक्षक संतोष खाडे आणि तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्या उपस्थितीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटवली.
नेवासा-नेवासा फाटा रस्त्यावर असलेल्या दुकानांनी केलेली अतिक्रमणे पूर्णपणे हटवण्यात आली. या मोहिमेत पाटबंधारे विभागाचे अधिकारी, पोलिस उपाधीक्षक खाडे, तहसीलदार डॉ. बिरादार आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. किरकोळ अपवाद वगळता ही मोहीम शांततेत पार पडली. अतिक्रमण हटवताच पाटबंधारे विभागाने चाऱ्यांची खोदाई सुरू केली. ही कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. या मोहिमेमुळे परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.





