Pune District : शिव रस्त्यावरील अतिक्रमण काढा

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा व कुंजीरवाडी या गावांना जोडणा-या 33 फूट रुंदीच्या शिव रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढून हद्द कायम करुन देण्याची मागणी आळंदी म्हातोबा येथील 129 शेतकर्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी जीतेंद्र डुडी यांच्याकडे केली आहे.
या निवेदना नुसार आळंदी म्हातोबा व कुंजीरवाडी या दोन्ही गावांना जोडणारा ग्रामीण मार्ग 249 हा शिवरस्ता आहे. हा रस्ता शासनाच्या मंजूर नकाशा नुसार 33 फुट रुंदीचा आहे. 2000 शेतकरी व रहिवासी या सार्वजनिक रस्त्यावर अवलंबून आहेत. मात्र दोन्ही गावातील काही ग्रामस्थांनी व शेतकर्यांनी रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण करून रस्त्याची मूळ रुंदी कमी केलेली आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी 9 ते 12 फूट झाली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन वारंवार वाद-विवाद होतात. शेतक-यांच्या शेतात व नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी साठत आहे. काही लोकांच्या आडमुठपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.
त्यामुळे हा नकाशाप्रमाणे रस्त्याची अधिकृत मोजणी करून तत्काळ अतिक्रमण काढावे. अतिक्रमण करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनावर सह्या करणार्या शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. सदर शिवरस्त्याबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्याची माहिती शेतकर्यांनी दिली आहे. शेतकर्यांनी हेच निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी हवेली, अप्पर तहसीलदार लोणी काळभोर, गटविकास अधिकारी यांनाही दिले आहे.
हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वारंवार वाद होतात. संकटकाळात रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या नेण्यास अडथळा होणार असून नर्सरी धारक व शेतकर्यांना शेतीमाल बाहेर काढणे खूपच जिकीरीचे झाले आहे.
– सायली शिवरकर, सदस्या, आळंदी म्हातोबा ग्रामपंचायत





