DSK Scam News: डीएसकेंच्या २०० ठेवीदारांचा मृत्यू ! हक्काच्या पैशांसाठी म्हातारपणात जिवाचा आकांत
DSK Scam News: उतारवयात उपचारासाठीही पैसे उरले नाहीत; डीएसके प्रकरणात राज्यातील २०० ज्येष्ठ ठेवीदारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक यादी समोर.

DSK Scam News – ठेवींवर चांगला परतावा मिळतोय म्हणून आयुष्याची पुंजी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्याकडे गुंतविणारे ठेवीदार आता आपले पैसे मिळावे म्हणून जिवाचा आटापिटा करत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे आतापर्यंत राज्यातील २०० ठेवीदारांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांच्या नावाची यादीच ठेवीदारांच्या संघटनेने तयार केली आहे.
मृत्यू झालेल्यांपैकी काही ठेवीदार सुनावणीवेळी न्यायालयातही हजर राहत होते. आजारपण, मुला-मुलीचे लग्न, घराचे बांधकाम अशा विविध कारणांसाठी त्वरित पैसे मिळावे म्हणून अनेकांची न्यायालयीन लढाई सुरूच आहे. या प्रकरणात डीएसके, त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई, मेव्हणी यांच्यासह काही नातेवाईक आणि बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक झाली होती.
बँकेच्या अधिकाऱ्यांना गुन्ह्यातून वगळले आहे. मुख्य आरोपींसह अनेकांना जामिनही मिळाला आहे. डीएसके यांनी राज्यातील ३५ हजारहून गुंतवणूकदार आणि बॅंकांची ४ हजार कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. गुंतवणूकदारांमध्ये पुण्यातील नागरिक सर्वाधिक संख्येने आहेत.
म्हातारपणी कोर्टाची पायरी
डीएसके यांच्याकडे गुंतवणूक केलेल्यांमध्ये सर्व सामान्यांपासून व्यावसायिक, सरकारी अधिकारी आणि नोकरदारांचा समावेश आहे. अनेक वर्ष चांगला परतावा मिळत असल्याने अनेकांनी आपले पैसे डीएसके यांच्याकडे गुंतवले होते. यात पैसे अडकल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला असून उतारवयात कोणताही चूक नसताना हक्काच्या पैशासाठी न्यायालयाची पायरी चढण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे.
पैशांसाठी आत्महत्या
मुलीच्या लग्नासाठी डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने जानेवारी २०२३ तानाजी गणपत कोरके (वय ६०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येसाठी डीएसके यांना जबाबदार ठरवले आहे. कोरके यांनी मुलींच्या मुलांच्या शिक्षणासाठी ५० हजार रुपये डीएसके डेव्हलपर्सकडे गुंतवले होते.
“हे प्रकरण लवकर निकाली लागून पैसे मिळावे, अशी आमची इच्छा आहे. गुंतवणूकदारांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. काही ठेवीदारांकडे आता आजारपणालाही पैसे नाहीत, अशी स्थिती आहे. आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या २०० ठेवीदारांची माहिती आमच्याकडे आहे. हा आकडा जास्तही असू शकतो.”
-ॲड. चंद्रकांत बिडकर, ठेवीदारांचे वकील






