Drone attack : युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन आता साडेचार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि हा संघर्ष अद्यापही सुरूच आहे.

Drone attack – रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन आता साडेचार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि हा संघर्ष अद्यापही सुरूच आहे. रशियाने रविवारी युक्रेनच्या विविध भागांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
या हल्ल्यात सुमी शहरातील भारतीय औषधनिर्मिती कंपनीच्या प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले असून मुख्य इमारत उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाल्याचे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले.
झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत रशियाने युक्रेनवर १३५ ड्रोन डागल्याचा दावा केला. त्यापैकी ५० हून अधिक ड्रोन जेट-चालित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कीव्ह, निप्रो, खार्कीव्ह, डोनेत्स्क, सुमी आणि झापोरिझिया या भागांना हल्ल्याचे लक्ष्य करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
रशियन ड्रोन हल्ल्यात सुमी येथील भारतीय औषधनिर्मिती कंपनीच्या प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. प्रकल्पाची मुख्य इमारत उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.
या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले आहे. मात्र, संबंधित भारतीय कंपनीचे नाव आणि नुकसानीचे नेमके आर्थिक मूल्य याबाबतची माहिती तत्काळ स्पष्ट झालेली नाही.
झेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्याने कीव्हमधील एका पुलावर आणि सुमी येथील औषध साठवणूक केंद्रावर ड्रोन हल्ले केले. निप्रो शहरातील एका दळणवळण केंद्रालाही लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमुळे काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याचे त्यांनी सांगितले.
युक्रेनच्या अध्यक्षांनी रशियाकडून निवासी इमारती आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे. हल्ल्यानंतर मदत आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाल्याचेही त्यांनी सांगितले.





