Pune | राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून रेखाचित्रण प्रशिक्षण वर्ग

पुणे : राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठाच्या सहकार्याने रेखाचित्र काढण्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी अशा अठराजणांनी नुकतेच रेखाचित्र प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. मात्र, आजही गुन्हेगारांचा माग काढण्यात रेखाचित्र महत्वाचे ठरत आहे. रेखाचित्र काढण्याचे कसब पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मिळावे, या विचाराने तत्कालिन पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांच्या सूचनेनुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागात रेखाचित्र कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यासाठी सीआयडीचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला होता.
पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना रेखाचित्र प्रशिक्षण देण्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठाचे सहकार्य घेण्यात आले होते.त्यानुसार पोलीस दलातील अठराजणांनी रेखाचित्र प्रशिक्षण वर्ग नुकताच पूर्ण केला. १ फेब्रुवारी ते २२ एप्रिल दरम्यान प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अठराजणांना सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक संभाजी कदम, प्रा. अविनाश कुंभार, प्रा. सुरेश गोसावी, पोलीस उपअधीक्षक अनुजा देशमाने आदी याप्रसंगी उपस्थित होते.





