Ujjwala Thite | सोलापुरातील अनगर नगरपंचायती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरवण्यात आला आहे. अनगरमध्ये मंगळवारी रात्री हा ट्विस्ट आला आहे. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी उज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या आवश्यक कागदपत्रांमध्ये सूचकाची सही नव्हती, या मुद्द्याकडे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आणि अर्ज बाद झाला. यानंतर आता उज्वला थिटे यांनी प्रतिक्रिया दिली. “अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चार ते पाच दिवस संघर्ष करत होते. तेवढ्या संघर्षातून मी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुरुवातीला तर कागदपत्रे मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या. कागदपत्रे मी माझ्या वकिलाकडून तपासून घेतली होती. प्रत्येक कागदपत्रावर माझ्या मुलाची सही होती. काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता. तरी सुचकाची सही राहिलीच कशी? हे शक्यच नाही. माझा अर्ज कसा बाद झाला किंवा केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागणार आहे,” उज्वला थिटे म्हणाल्या. Ujjwala Thite | दरम्यान, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन पाटील यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अनगर ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व आहे. अनगर ग्रामपंचायतीचे पहिल्यांदाच नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्याने राजन पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. अजित पवारांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी दिल्याने राजन पाटील यांना आव्हान दिलं होतं. उमेदवारी अर्ज भरता येऊ नये म्हणून राजन पाटील यांनी गुंडांची फौज उभी केली. नगरपरिषदेच्या कार्यालयात पोहोचू नये यासाठी संपूर्ण यंत्रणाही कामाला लावली, असा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला होता. त्यानंतर सोमवारी पहाटे ५ वाजता पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अनगरमध्ये कोणीही उमेदवारच उभा न राहिल्याने राजन पाटील यांच्या पॅनेलच्या १७ जागा बिनविरोध निवडून आल्या. तर नगराध्यक्षपदासाठी राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. Ujjwala Thite | नेमकं काय घडलं? अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तीन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये भाजपकडून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उज्वला थिटे आणि अपक्ष सरस्वती शिंदे यांनी अर्ज केला होता. काल अर्जाच्या छाननीत उज्वला थिटे यांनी नामनिर्देशन पत्रात सूचकाची सही केली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. यानंतर चौकशी केली असता उज्वला थिटे यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती अनगर नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली. उज्ज्वला थिटेंचा अर्ज होण्यामागची चार कारणे उज्ज्वला थिटेंनी वय नमूद केले पण पुरावा दिला नाही. उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर सूचक म्हणून सहीच नव्हती. उज्ज्वला थिटेंनी प्रभाग क्रमांक 4 ऐवजी 5 असा चुकीचा लिहिला. उज्ज्वला थिटेंनी मतदार यादीत अनुक्रमांक 217 ऐवजी 1042 असा चुकीचा नमूद केला. हेही वाचा: आंध्र प्रदेशात मोठी कारवाई ! मारेदुमिल्ली जंगलात ७ नक्षलवादी ठार ; तांत्रिक तज्ज्ञ ‘शंकर’चाही समावेश