Pune politics : भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार; अमोल बालवडकरांच्या भूमिकेवर गणेश बिडकरांचा आक्षेप
Pune politics : अमोल बालवडकर यांच्या आक्रमक भूमिकेविरोधात भाजपने सुनेत्रा पवारांकडे तक्रार केली. गणेश बिडकरांनी बालवडकरांच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेतले.

Pune politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समिती सदस्य अमोल बालवडकर यांच्या आक्रमक भूमिकेविरोधात भाजपने थेट उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पवार यांना पत्र पाठवून बालवडकर यांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यावर केलेल्या टीकेचा उल्लेख केला आहे.
महापालिका निवडणुकीनंतर भाजपने राष्ट्रवादीच्या सदस्यांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याची भूमिका घेतली असून, अंदाजपत्रकात विकासकामांसाठी निधीही उपलब्ध करून दिल्याचा दावा बिडकर यांनी पत्रात केला आहे. तसेच मुख्य सभेत राष्ट्रवादीच्या सदस्यांना बोलण्यासाठी भाजपच्या सदस्यांपेक्षा अधिक वेळ दिल्याचेही त्यांनी आकडेवारीसह नमूद केले आहे.
११ ऑगस्ट रोजी झालेल्या तिरंगा रॅलीवर बालवडकर यांनी मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील आणि महापौरांवर टीका केल्याचा आरोप बिडकर यांनी केला आहे. तसेच ३ ऑगस्ट रोजी बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील आमदार विकास निधीतून झालेल्या कामांच्या चौकशीचा प्रस्ताव स्थायी समितीत दिल्याचा उल्लेखही पत्रात आहे.
१८ ऑगस्टच्या मुख्य सभेत बालवडकर यांनी विषय दाखल करून घेण्यास विरोध केला. त्यांची भूमिका अहंकारी, असंसदीय आणि कामकाजात अडथळा आणणारी असल्याचा आरोप बिडकर यांनी केला.
दरम्यान, बालवडकर आणि टिंगरे यांच्या प्रभागातील निधी वर्गीकरणाचा निर्णय भाजपने घेतला असून, हा निर्णय पक्षाच्या भूमिकेनुसार असल्याचे बिडकर यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. या पत्राची प्रत मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही पाठविण्यात आली आहे.





