Pune District : आंबेठाण चौकातील ड्रेनेजलाइनचे काम अखेर सुरू
Pune District : ड्रेनेज लाइनची रचना योग्य नसल्याने सांडपाणी पुढे न वाहता एका ठिकाणी साचत होते. त्यातच पावसाळा तोंडावर असताना काम अपूर्ण राहिल्याने पहिल्याच पावसात आंबेठाण चौक जलमय होऊन वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

चाकण : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकण येथील आंबेठाण चौकात रखडलेल्या आणि सदोष ड्रेनेज लाइनच्या कामाबाबत ’दैनिक प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित प्रशासकीय यंत्रणेला अखेर जाग आली आहे. या वृत्ताची गंभीर दखल घेत संबंधित विभागाने तातडीने अपूर्ण राहिलेले काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त करत ’दैनिक प्रभात’चे आभार मानले आहेत.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकणचा आंबेठाण चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी सर्व्हिस रोडलगत सांडपाणी वाहून नेण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ड्रेनेज लाइनचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र हे काम अत्यंत संथ गतीने आणि तांत्रिक त्रुटींनी युक्त पद्धतीने सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात होती. ड्रेनेज लाइनची रचना योग्य नसल्याने सांडपाणी पुढे न वाहता एका ठिकाणी साचत होते. त्यातच पावसाळा तोंडावर असताना काम अपूर्ण राहिल्याने पहिल्याच पावसात आंबेठाण चौक जलमय होऊन वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता.
स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन *’दैनिक प्रभात’*ने या विषयावर सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. कोट्यवधी रुपये खर्च करूनही ड्रेनेज लाईनचे काम निकृष्ट आणि अपूर्ण असल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला होता. तसेच पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास उद्भवणार्या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.
प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि काम पुन्हा सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून दैनिक प्रभातच्या लोकाभिमुख पत्रकारितेचे कौतुक केले जात आहे.
कामाला वेग
वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभागाने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. वरिष्ठ अधिकार्यांनी कंत्राटदाराला आवश्यक सूचना देत अपूर्ण काम त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आंबेठाण चौकातील ड्रेनेज लाईनचे उर्वरित काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून तांत्रिक त्रुटी दूर करून पाण्याचा योग्य निचरा होईल यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे पावसाळ्यात आंबेठाण चौकात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती होती. मात्र दैनिक प्रभातने आमचा आवाज प्रभावीपणे मांडला. वृत्त प्रसिद्ध होताच कामाला सुरुवात झाली. आता हे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे, एवढीच अपेक्षा आहे.
– स्थानिक नागरिक व व्यापारी, चाकण
हेही वाचा : Pune District : भामा आसखेड धरणात 15 लाख मत्स्यबीजांचे संवर्धन





