Pune District : मोडकळीस आलेल्या वाड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात
Pune District : काही भागात घरांच्या भिंती पडून दोन ते तीन वर्षे झाली आहेत, मात्र अद्याप नगरपालिका प्रशासनाने याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.

महुडे : पावसाळा अगदी तोंडावर आलेला असतानाही भोर शहरात प्रशासकीय पातळीवर मान्सूनपूर्व कामांची सुरुवात झालेली दिसत नाही. शहरात अनेक ठिकाणी जुनी घरे आणि ऐतिहासिक वाडे मोडकळीस आले असून, काही ठिकाणी अर्धवट पडलेल्या भिंती तशाच उभ्या आहेत. या धोकादायक इमारतींमुळे शेजारील घरांना आणि पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या पडक्या वाड्यांना आता झाडाझुडपांचा वेढा पडला असून, भविष्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची भीती परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
काही भागात घरांच्या भिंती पडून दोन ते तीन वर्षे झाली आहेत, मात्र अद्याप नगरपालिका प्रशासनाने याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. दरवर्षी मान्सूनपूर्व कामांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो, मात्र प्रत्यक्ष जमिनीवर कोणतीही कामे दिसत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या संदर्भात भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शहरातील धोकादायक इमारतींच्या घरमालकांना पालिकेमार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित घरमालकांनी ठराविक दिवसांत स्वतःहून धोकादायक भाग काढून घ्यावा, अन्यथा पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासन त्यावर थेट कारवाई करेल.
तसेच, नालेसफाई, गटार सफाई, झाडांची छाटणी, सखल भागातील पाण्याचा निचरा करण्याचे नियोजन, पथदिवे दुरुस्ती आणि आपत्कालीन कक्ष उभारणी आदी मान्सूनपूर्व कामांना सुरुवात झाली असल्याचा दावाही त्यांनी केला.
पालिकेत स्वतंत्र आपत्कालीन नियंत्रण कक्ष संकल्पना नसून पालिकेतील विविध अधिकाऱ्यांना दर पंधरा दिवसांसाठी यासाठी जबाबदारी दिली जाते.मात्र प्रशासनाने नागरिकांसाठी एकच आपत्कालीन संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे.
– अमित सागळे, नगरपालिका गटनेते, भाजप.
हेही वाचा : Pune District : अनधिकृत पार्किंगला पोलिसांचा चाप; नारायणगाव बसस्थानक आवारात पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई





