Pune District : भामा आसखेड धरणात 15 लाख मत्स्यबीजांचे संवर्धन
Pune District : मत्स्य संवर्धन आणि रोजगार निर्मिती या दोन्ही उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

शिंदे-वासुली : खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात चालू हंगामासाठी तब्बल 15 लाख मत्स्यबीज सोडण्यात आले आहेत. शिवे येथील आदिवासी पश्चिम विभाग मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला असून यामुळे परिसरातील मत्स्य उत्पादनात वाढ होण्याबरोबरच स्थानिक मासेमारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
भामा आसखेड जलाशयात कटला, रोहू आणि पोपट या जातींच्या मत्स्यबीजांचे संगोपन करण्यात आले आहे. ‘बोटुकली’ स्वरूपातील ही मत्स्यबीजे जलाशयातील नैसर्गिक वातावरणात वाढून भविष्यात मोठ्या प्रमाणावर मत्स्य उत्पादनास हातभार लावणार आहेत. मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेने जलाशयातील पाणीसाठा, हवामान आणि मत्स्य संवर्धनासाठी आवश्यक घटकांचा अभ्यास करून योग्य वेळी मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकार्यांनी दिली. या उपक्रमामुळे स्थानिक मासेमारांना अधिक प्रमाणात मासेमारीची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मत्स्य संवर्धन आणि रोजगार निर्मिती या दोन्ही उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंके यांनी स्थानिक मासेमारांना नियमानुसार मासेमारी करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, लहान मत्स्यबीजांचे संरक्षण होण्यासाठी पुढील चार महिन्यांच्या कालावधीत मासेमारी करताना एक बोटीपासून पाच बोटीपर्यंत जाळे पाण्यात सोडू नये. त्यामुळे लहान माशांचे नुकसान टाळता येईल आणि भविष्यात मत्स्य उत्पादन अधिक वाढेल.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंके यांच्यासह सचिन लांडगे, गणेश भुजबळ, चांगदेव शिवेकर, शांताराम शिवेकर, ज्ञानेश्वर शिवेकर, नामदेव शिवेकर, आनंद साकोरे, तुकाराम शिवेकर, दत्ता गावडे, सुनील कडाळे, मंदा मुकणे तसेच संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते.
सर्व मासेमारांनी नियमांचे पालन करून मासेमारी करावी. लहान माशांचे संगोपन झाले तर भविष्यात मत्स्यव्यवसाय अधिक बळकट होईल आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील.
– ज्ञानेश्वर साळुंके, अध्यक्ष, आदिवासी पश्चिम विभाग मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था
हेही वाचा : Pune District : कडूस-चासमध्ये महिलांच्या मतदानाला हरताळ?





