Pune: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉ. रामचंद्र व सुनीता गोडबोले यांचा पुण्यात सत्कार
Pune: गेल्या ३५ वर्षांपासून निस्वार्थी भावनेने आदिवासी व वनवासी बांधवांची आरोग्यसेवा

पुणेः भारत सरकारने २०२६ च्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आयुर्वेदाचार्य डॉ. रामचंद्र गोडबोले व सुनीता गोडबोले यांचा ‘केशव माधव विश्वस्त निधी’तर्फे कर्वेनगर येथील ‘शैलेश’ सभागृहात सत्कार सोहळा पार पडला.
छत्तीसगडमधील अतिदुर्गम बस्तर भागात गेल्या ३५ वर्षांपासून निस्वार्थी भावनेने आदिवासी व वनवासी बांधवांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या या दाम्पत्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगर संघचालक उदयन पाठक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी केशव माधव विश्वस्त निधीचे अध्यक्ष रवींद्र जावळे, निवृत्त एअर मार्शल प्रदीप बापट आणि सचिव अरविंद देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमप्रसंगी नाट्यकलावंत प्रशांत कुलकर्णी यांनी गोडबोले दांपत्याची मुलाखत घेतली, ज्यातून त्यांचा संघर्षमयी सेवाप्रवास, वनवासी समाजातील अनुभव आणि समाजकार्याची प्रेरणा उपस्थितांसमोर उलगडली. मुलाखतीनंतर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना गोडबोले दांपत्याने समर्पक उत्तरे दिली.
‘सामाजिक कार्यासाठी समाजाने प्रत्यक्ष मदत करावी’
सत्काराला उत्तर देताना डॉ. रामचंद्र गोडबोले यांनी दामूअण्णा दाते, भास्करराव कळंबी व बाळासाहेब दीक्षित यांच्याकडून त्यांना सेवेची प्रेरणा मिळाली असल्याचे सांगितले. तसेच गोडबोले यांनी कुपोषण, मलेरिया, क्षयरोग व रक्तक्षयमुक्त बस्तर हे माझे स्वप्न असून वनवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणणे, निरोगी ठेवणे आणि समाजात आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असा निर्धारही व्यक्त केला. या सामाजिक कार्यासाठी समाजाने प्रत्यक्ष मदत करावी, असे आवाहनही गोडबोले दांपत्याने केले.
तर सुनीता गोडबोले यांनी “आदिवासी समाजबांधवांची दुःख समजवून घेण्यासाठी संवेदनशीलता असावी लागते तसेच त्यांची स्थानिक भाषा अवगत करावी लागते. वनवासी क्षेत्रातील कार्य करण्याची प्रेरणा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रचनात्मक कार्यातून मिळाली. त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित करून त्यांच्या आरोग्याकडे अधिकाधिक लक्ष देण्याचे काम गेले 35 वर्षापासून करत आहोत. त्यामुळे बस्तर भागात अधिक कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला मिळत आहे”, असे यावेळी प्रतिपादन केले.
याच सोहळ्यात बुद्धिबळ विषयात बालाजी विद्यापीठाची ‘पीएच.डी.’ पदवी संपादन केल्याबद्दल राष्ट्रीय बुद्धिबळपटू व नामांकित प्रशिक्षक मकरंद वेलणकर यांचाही पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या विश्वस्त कविता शेंडे यांनी केशव माधव विश्वस्त निधीच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. प्राची पाठक यांच्या संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर विश्वस्त प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले. या सोहळ्यास नागरिक, विद्यार्थी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ‘वनवासी कल्याण आश्रम’चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा:
SIR Campaign: मतदारांसाठी धोक्याची घंटा! २८ लाख मतदारांची नावे वगळली जाणार? आजच तपासा यादी





