SIR Campaign: मतदारांसाठी धोक्याची घंटा! २८ लाख मतदारांची नावे वगळली जाणार? आजच तपासा यादी
SIR Campaign: मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेसाठी सोमवारी १७ ऑगस्ट रोजी अंतिम मुदत; २८ लाख ३८ हजार ७१९ मतदारांची नावे 'गोळा' न करता येणाऱ्या श्रेणीत' समाविष्ट.

SIR Campaign – मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत जिल्ह्यात आतापर्यंत २८ लाख ३८ हजार मतदार वगळले जाण्याची शक्यता असून, संबंधितांची नावे मतदारसंघनिहाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. दरम्यान, एसआयआर मोहिमेअंतर्गत गणना अर्ज समाविष्ट करण्यासाठी सोमवारी (दि. १७) अंतिम मुदत आहे.
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला आता केवळ एकच दिवस उरला आहे. जिल्ह्यात ९० लाख ८० हजार १७३ मतदार असून, आतापर्यंत ८९ लाख ३४ हजार ४५९ अर्थात ९९.५० टक्के मतदारांना गणना अर्जांचे वाटप केल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे. पूर्ण माहिती भरलेल्या ६० लाख ९७ हजार ६१७ मतदारांचे गणना अर्ज संकेतस्थळावर अपलोड केले आहेत.
एकूण मतदार संख्या लक्षात घेता ही संख्या ६७.१५ टक्के इतकीच आहे. उर्वरित २८ लाख ३८ हजार ७१९ अर्थात ३१.२६ टक्के मतदार अनुपस्थित, स्थलांतरित, दुबार व मृत असल्याने हे अर्ज गोळा न करता येणाऱ्या श्रेणीत टाकण्यात आले आहेत. या सर्व मतदारांची यादी मतदारसंघनिहाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुरावा आवश्यक
ज्या मतदारांची नावे २००२ च्या यादीऐवजी २०२५ च्या यादीत आहेत, त्यांना प्रारूप मतदार यादीत स्थान दिले जाणार आहे. त्यानंतर होणाऱ्या सुनावणीत या मतदारांना २००२ मधील आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतरच त्यांना अंतिम मतदार यादीत स्थान मिळेल.




