IAS पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा उघड; ‘ती’ कागदपत्रे आली समोर

पुणे : मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रं अखेर सापडली आहेत. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात ही कागदपत्रं सापडली आहेत. यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक होणार आहे तेव्हा ही कागदपत्रं सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांच्याकडून देण्यात आली आहे. पूजा खेडकर यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिलं होतं. जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2021 मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आले होते.
मेडिकल कॉलेज प्रवेशासाठी खोटी कागदपत्र
पूजा खेडकरने मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठीही नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सादर केलं होतं अशी माहिती समोर आलीय. पूजा खेडकर यांनी 2007 मध्ये पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी ऍडमिशन घेतलं होतं. यावेळी NT – 3 म्हणजेच भटक्या जमातींसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातून ऍडमिशन घेतलं होतं. कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 8 लाखांच्या आत असेल तरच नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट देण्यात येतं. मात्र त्यांनी मेडिकल प्रवेशासाठीही नॉन क्रिमीलेअरचा वापर केल्याचं समोर आले आहे. दरम्यान मेडिकल प्रवेशावेळी विद्यार्थ्याला फिटनेस सर्टिफिकेट देखील सादर करावं लागतं. काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकरांनी फिटनेस सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्यामध्ये त्यांनी कुठल्याच स्वरूपात दिव्यांग नसल्याची नोंद आहे. त्यामुळे कॉलेज प्रवेशाच्या वेळी मात्र त्या पूर्णपणे तंदुरुस्त होत्या अशी माहिती समोर आली आहे. यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांविरोधात भीकमांगो आंदोलन
पुण्यातील IASची ट्रेनिंग घेणारी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांविरोधात भीकमांगो आंदोलन करण्यात आलं आहे. पानशेत परिसरातील शेतकरी आणि जागृत पुणेकरांकडून हे आंदोलन करण्यात आले आहे. पिस्तुल रोखून हुसकवण्याची भाषा करणाऱ्या खेडकर कुटुंबियांविरोधात पैसे मागून भीकमागो आंदोलन करण्यात आलं आहे तसेच आरोपींची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुणेकरांकडून करण्यात आली आहे.





