nagar | डॉ. अशोक इथापे यांची धर्मादाय रुग्णालय समितीवर निवड

संगमनेर, (प्रतिनिधी) – शासनाच्या विधि व न्याय विभागाच्या निर्णयान्वये धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करून देण्याकरिता गठीत जिल्हास्तरीय समितीवर माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे, आ. मोनिका राजळे, डॉ. अशोक इथापे तर नगर शहरातून डॉ. सुहास घुले आणि स्नेहालयाचे डॉ. गिरीष कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरीता योजना तयार केली आहे. त्यानुसार प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण खाटांपैकी 10 टक्के खाटा दुर्बल घटकांतील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या रुग्णालयांना बंधनकारक आहे.
धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित खाटा पारदर्शी पध्दतीने निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी विधि व न्याय विभागाच्या निर्णयान्वये राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यस्तरीय विशेष मदत कक्षास सहाय्य करण्यासाठी विधी व न्याय विभागाच्या निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेली जिल्हास्तरीय समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे.





