Pune: वसतिगृहाची दूरवस्था; निवेदन देऊनही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे – पुणे महापालिकेच्या घोले रस्त्यावर भर शहरात असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहाची दूरवस्था झाली आहे. दूषित पाण्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मुळावर बेतला आहे. लगतच असणाऱ्या कचरा डेपोमुळे दुर्गंधी पसरत आहे. वसतिगृहातील सोयीसुविधा लवकरच पूर्ण कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.
समाजकल्याण व महापालिका यांच्या विद्यमाने सुरू असलेल्या वसतिगृहात जवळपास ५०० विद्यार्थी आहेत. वसतिगृहाच्या शेजारी कचरा डेपो आहे, त्याचा वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे. सध्या, पावसाळ्यात दुर्गंधी वाढली आहे. इमारतीत मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठीचे फिल्टरही बंद आहे.
दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून वसतिगृहातील विद्यार्थी याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. यासंदर्भात आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. तसेच, सर्व सोयीसुविधा देण्याबाबत मागणीही केली आहे. परंतु. त्यानंतरही वसतिगृहाची दूरवस्था कायम आहे.
‘वसतिगृहाची दुरूवस्था झालेली असताना तसेच मलेरिया, डेग्युने दोन विद्यार्थी दगावल्याचा आरोप होत असतानाही प्रशासनास गांभीर्य नाही. हाकेच्या अंतरावर सुसज्ज महौपार बंगला तर एका बाजुला अस्वच्छ वसतिगृह आहे. या विद्यार्थ्यांना कोणी वालीच नाही का, या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कारवाई करावी.’ – अॅड. कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पींग हँडस
‘वसतिगृहातील स्थितील अत्यंत भयानक आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असून. आतापर्यत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. आणखी दोन मुले रुग्णालयात उपचार घेत आहेत. महापालिकेने तातडीने वसतिगृहातील सोयीसुविधा उपलब्ध करुन द्यावी. अन्यथा जवळच असलेला महापौर बंगला विद्यार्थ्यांना खुली करून द्यावा.’ – प्रशांत कनोजिया, राज्य संघटक, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.





