उड्डाणपुलांचे ‘डीपीआर’ अंतिम टप्प्यात; पुण्याच्या सर्वच प्रवेशद्वारांची वाहतूक कोंडी फोडण्याचे प्रयत्न

पुणे – पुणे ते सोलापूर महामार्ग, पुणे ते शिरुर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि नाशिक फाटा ते खेड या चार महामार्गांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या महामार्गांवर उड्डाणपूल प्रस्तावित केले आहेत. सद्यस्थितीत यासाठीचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर)तयार करणे काम अंतिम टप्प्यात आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केली होती.
दरम्यान, यापैकी पुणे-सातारा मार्गावर कात्रज चौकात पुलाचे काम सुरू आहे. उर्वरित प्रकल्प मार्गी लागल्यास शहरात प्रवेश करणे सोपे होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी “एमएसआरडीसी’ आणि “पीएमआरडीए’कडून दोन रिंग रोड प्रस्तावित आहेत. मात्र, शहरातून जात असलेल्या महामार्गांलगत नागरीकरण वेगाने वाढत आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करताना आणि शहराबाहेर जाताना प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
नगर रस्त्यावर वाघोली परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. तसेच पुढे रांजणगाव एमआयडीसी असल्याने वाहनांची संख्याही मोठी असते. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना वेळेवर पोहचता येत नाही. तसेच “एमआयडीसी’ कामगारांना हीच समस्या जाणवते. हीच अवस्था तळेगाव आणि चाकण “एमआयडीसी’मधील कामगार, तसेच या महामार्गांवरील प्रवाशांची आहे. याचसह हडपसरहून सोलापूरला जाताना आणि येतानाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
चांदणी चौक येथून कोथरुडमध्ये येताना वाहतूक कोंडीत नागरिकांना अडकून पडावे लागत होते. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या कोंडीचा फटका बसला होता. त्यानंतर येथील प्रकल्पाने गती घेतली. अखेर येथील वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली आहे. त्यामुळे शहराचे पश्चिमेचे प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकातून प्रवास करणे सोयीस्कर झाले आहे. त्याच धर्तीवर पूर्व आणि उत्तरेकडून शहरात प्रवेश करणे सोपे होणार आहे.
…म्हणून उड्डाणपूल उभारणी
शहरालगतच्या गावांमध्ये वेगाने होणारे नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, अपुरे रस्ते, महामार्गालगत सेवा रस्त्या नसणे आदी कारणांमुळे वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होते. रस्ता रुंद करायचे झाल्यास भूसंपादन करणे अवघड होते. जागा देण्यास सहसा कोणी तयार होत नाही. तसेच भूसंपादनासाठी येणारा मोठा खर्च यामुळे आहे. त्यामुळे या महामार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला असल्याचे सांगण्यात आले.
मार्ग आणि उड्डाणपुलाची लांबी
- पुणे ते सोलापूर – 26 कि.मी.
- पुणे ते शिरूर -56 कि.मी.
- तळेगाव-चाकण-शिक्रापूर -54 कि.मी.
- नाशिक फाटा ते खेड -29 कि.मी.





