DPL Match Fixing : क्रिकेट विश्वात मॅच फिक्सिंगने खळबळ! स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकला सीएसकेचा खेळाडू? अखेर समोर येऊन केला मोठा खुलासा
DPL Match Fixing : या वादग्रस्त प्रकरणात नाव जोडले गेल्यानंतर 'सेंट्रल दिल्ली किंग्स' संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज वंश बेदीने अखेर आपले मौन सोडले आहे.

DPL Match Fixing Row Vansh Bedi Denies Allegations DDCA Statement : दिल्ली प्रीमियर टी-२० लीग (DPL) मधील कथित मॅच फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये नवा वाद पेटला आहे. या वादग्रस्त प्रकरणात नाव जोडले गेल्यानंतर ‘सेंट्रल दिल्ली किंग्स’ संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज वंश बेदीने (Vansh Bedi) अखेर आपले मौन सोडले आहे. सोशल मीडियावरील चर्चा आणि विविध बातम्यांमध्ये होत असलेले मॅच फिक्सिंगचे आरोप पूर्णपणे खोटे, निराधार आणि बदनामीकारक असल्याचे सांगत त्याने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
गुप्त स्टिंग ऑपरेशनने खळबळ; सोशल मीडियावर संशयाची सुई!
हा संपूर्ण वाद देशांतर्गत क्रिकेटपटू रचित भाटिया यांचा सहभाग असलेल्या एका गुप्त स्टिंग ऑपरेशनमुळे समोर आला. या ऑपरेशनमध्ये एका आयपीएल फ्रँचायझीशी संबंधित खेळाडू गोपनीय माहिती उघड करत असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला होता. मूळ स्टिंगमध्ये कोणत्याही खेळाडूचे थेट नाव घेण्यात आले नव्हते; तरीही सोशल मीडियावर संशयाची सुई वंश बेदीकडे वळली आणि तोच संबंधित खेळाडू असल्याचे दावे व्हायरल झाले.
‘माझा याच्याशी काडीमात्र संबंध नाही’; थेट कोर्टात जाण्याचा इशारा!
BREAKING: Vansh Bedi breaks silence on fixing allegations! 🚨
Ex-CSK player Vansh Bedi has issued an official statement denying all match-fixing & sting operation claims, calling them “false and defamatory.” ❌🏏#VanshBedi #CricketNews #IPLControversy #CricketUpdates pic.twitter.com/TFe7aMbLSM
— Khel Cricket (@Khelnowcricket) September 23, 2026
आपल्यावर चिखलफेक झाल्यानंतर वंश बेदीने इन्स्टाग्रामवर अधिकृत निवेदन जारी केले. “स्टिंग ऑपरेशनमध्ये रचित भाटिया यांनी ज्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे, ती व्यक्ती मी नाही. अशा कोणत्याही गैरकृत्यात माझा सहभाग नाही. सोशल मीडियावर माझी नाहक बदनामी केली जात असून, यामागे असणाऱ्यांविरोधात माझ्या कायदेशीर टीमने दिवाणी आणि फौजदारी कारवाई सुरू केली आहे,” असा सज्जड दम बेदीने दिला आहे.
डीडीसीएची संयमी भूमिका; आरोपांची अद्याप पडताळणी नाही!
या प्रकरणावर दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने (DDCA) स्पष्टीकरण दिले आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, समोर आलेले आरोप अद्याप कोणत्याही सक्षम प्राधिकरणाने सिद्ध केलेले नाहीत किंवा त्याची अधिकृत पडताळणी झालेली नाही. त्यामुळे केवळ अफवा किंवा वृत्तांच्या आधारे कोणत्याही खेळाडू अथवा फ्रँचायझीबाबत घाईघाईने निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे डीडीसीएने स्पष्ट केले आहे.





