Dowry Harassment – वाघोलीतील वेगवेगळ्या घटनेत छळामुळे संगणक अभियंता महिलेसह दोघींनी आत्महत्या केली. संगणक अभियंता महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पतीला अटक करण्यात आली. अभियंता महिलेच्या आत्महत्या प्रकरणी तिच्या भावाने फिर्याद दिली आहे. वाघोली पोलिसांनी पती अभिषेक गुप्ता ( 31) याला अटक केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन सासू, सासरे, नणंदेविरुद्ध ही गु्न्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहेत. आरोपीने पत्नीकडे दहा लाख हुंड्याची मागणी केली होती. मागणी पूर्ण न केल्याने तिचा शारिरिक, मानसिक छळ करण्यात आला. छळामुळे तिने वाघोलीतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करत आहेत. आव्हाळवाडी परिसरात एका 21 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती, सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रतिक्षा जयसिंग कदम असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती जयसिं मधुकर कदम (वय 29) याला अटक केली. या प्रकरणी सासू हौसाबाई (वय 55) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पतीने माहेरहून सोन्याची अंगठी आणण्याची मागणी केली होती. मोटारीची हप्ते भरण्यासाठी पैशांची मागणी करुन तिचा छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करीत आहेत.