यशवंतनगर – बनवडी गावात वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. परंतु, दि. २० जून रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांनी उपसरपंच नरहरी जानराव यांच्यावर भ्याड हल्ला करुन त्यांनी दहशत निर्माण केली. गावातील वातावरण दूषित केले. आदर्श बनवडी गावाचा बीड होऊ द्यायचा नसेल तर बनवडीत तयार होणारे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना वेळीच पायबंद घालावा लागेल, असे बनवडी (ता. कराड) येथील बनवडीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. शंकरराव खापे यांनी केले. ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या निषेध सभेत ते बोलत होते. यावेळी उपसरपंच नरहरी जानराव, ग्रामपंचायत सदस्य अख्तर अतार, पल्लवी साळुंखे, अलका पाटील, कमल म्हेत्रे, माजी सरपंच उषा करांडे, राजेंद्र यादव, हिंदूराव माने, मयूर भंडारे, बाळकृष्ण करांडे, सुदेश थोरात, शब्बीर आवटे, किशोर पाटील, नामदेव करांडे आदिंची उपस्थिती होती. यावेळी डॉ. खापे म्हणाले, “गावाला त्रास होईल असे कोणी वागू नये. धाराशिव येथील प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी आदर्श बनवडी ग्रामपंचायतीस भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर सागर शिवदास यांनी उपसरपंच नरहरी जानराव यांना मारहाण केली. शिवदास यांनी व्यक्तीपेक्षा पदाचा मान राखायला हवा होता. अशा घटनांमुळे बनवडीचा बीड व्हायला लागला आहे वाल्मिक कराड आणि सुर्शन घुले तयार होण्याआधी आपण सर्वांनी मिळून अशा प्रवृत्तींना आळा घातला पाहिजे”. यावेळी उपसरपंच नरहरी जानराव निषेध व्यक्त करताना म्हणाले, ‘आज माझी मुले शिवदास यांच्या वयाची आहेत. धाराशिव येथील आलेल्या शिष्टमंडळासमोरच मला मारहाण करण्यात आली. माझ्या वयाचा शिवदास यांनी विचार करायला हवा होता. ग्रामपंचायतीमध्ये हे कोणत्याही पदावर नसताना सतत हस्तक्षेप असतो. त्यामुळे अनेकांना त्याचा त्रास झाला आहे. गावात सध्या दहशतीचे वातावरण असून त्यांना कोणीही घाबरु नये’. यावेळी हिंदूराव माने, पल्लवी साळुंखे, अख्तर आत्तार, ऊषा करांडे, आदिंसह इतर ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त करून निषेध नोंदवला. यावेळी ग्रामस्थांनी “नहीं चले गी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी” अशा घोषणा दिल्या.