तुमच्याकडे मतदानासाठी Voter ID नाही? आता १२ पैकी कोणत्याही एका पुराव्याद्वारे करता येईल मतदान

Maharashtra Assembly Election 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी उद्या अर्थात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक आयोग आणि इतर प्रशासकीय यंत्रणांकडून मतदानाची तयारी सुरू झाली आहे. परंतु मतदान करण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र अर्थात व्होटर्स आयडी आवश्यक असते. मात्र आता तुमच्याकडे व्होटर आयडी नसले तरी चालणार आहे. निवडणूक आयोगाने व्होटर्स आयडीशिवाय अन्य 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरणार असल्याचं जाहीर केलं आहे.
अद्याप लाखो लोकांचे मतदार म्हणून नोंद असतानाही त्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नाही. त्यामुळे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार असून यापैकी एकही पुरावा मतदान केंद्रावर दाखवल्यास तुम्हाला मतदान करता येणार आहे. त्यानुसार आता व्होटर्स आयडी नसलेल्यांना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. ते कोणते हे जाणून घेऊयात…
- आधार कार्ड.
- बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक.
- वाहन चालक परवाना. (ड्रायव्हिंग लायसन्स)
- स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड)
- भारतीय पारपत्र. (पासपोर्ट)
- मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र. (जॉब कार्ड)
- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड.
- छायाचित्र असलेली निवृत्ती वेतनविषयक कागदपत्रे.
- केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र.
- संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र.
- भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र
मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी
मतदान केंद्रात आणि केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक सोडून निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी, मतदार, वार्ताहर आदी कोणाही व्यक्तीला कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, पेन कॅमेरा, वायरलेट सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास बंदी आहे.
अनवधानाने आणल्यास मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतरावर ठेवावा लागेल. मतदान केंद्रावर किंवा मतमोजणी केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याबाबत सर्व उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य करावे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार दंडनीय कारवाई केली जाऊ शकते.
व्हिडीओ, फोटो काढून प्रसारित केल्यास कठोर कारवाई
निवडणूक कामकाजाची छायाचित्रे काढणे किंवा चित्रीकरण करणे, त्यांचे तसेच निवडणूकविषयक अफवा पसरविणारे संदेशाचे व्हॉटस्अॅप ग्रुप, समाजमाध्यमांवर प्रसारण करणे हा गंभीर गुन्हा आहे, असे करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिला आहे.
दरम्यान, मतदानावेळी मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये या उद्देशाने मतदारांनी मतदानकेंद्रात मोबाईल घेऊन जाऊ नये. मतदानकेंद्रावर मतदान अधिकारींच्या तसेच कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन निवडणूक आयोगानं केले आहे.
हेही वाचा:
हिंसाचार रोखण्यासाठी मणिपूरमध्ये आणखी ५० CAPF तुकड्या दाखल ; अनेक जिल्ह्यांत कर्फ्यू, इंटरनेट बंद





