पॅनकार्डप्रमाणेच आता मतदार ओळखपत्रही आधारशी लिंक होणार, निवडणूक आयोगाची तयारी सुरू

नवी दिल्ली – निवडणूक पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने आता मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाऊ शकते. पॅन कार्डप्रमाणेच आता मतदार ओळखपत्र (EPIC) ला आधारशी लिंक करण्याच्या योजनेवर निवडणूक आयोग गांभीर्याने काम करत आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात गृह मंत्रालय, कायदा मंत्रालय आणि आधार जारी करणारी संस्था UIDAI यांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बनावट आणि डुप्लिकेट मतदारांची ओळख पटवून मतदार यादी शुद्ध करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
वृत्तानुसार, 2021मध्ये लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मध्ये सुधारणा केल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदारांकडून स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यास सुरुवात केली. मात्र, अद्यापपर्यंत निवडणूक आयोगाने आधार आणि मतदार ओळखपत्राचा डेटाबेस लिंक केलेला नाही. डुप्लिकेट मतदार नोंदणी ओळखून मतदार यादी शुद्ध करता यावी यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, परंतु आधारशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले नव्हते.
18 मार्च रोजी महत्त्वाची बैठक –
18 मार्च रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि निवडणूक आयुक्त विवेक जोशी या विषयावर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, विधान विभागाचे सचिव राजीव मणी आणि UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांची घेणार आहेत. ही बैठक अशा वेळी होत आहे जेव्हा तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये मतदारांचा EPIC क्रमांक समान असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर, निवडणूक आयोगाने मान्य केले आहे की, काही राज्यांमध्ये चुकीच्या अल्फान्यूमेरिक मालिकेमुळे तेच क्रमांक पुन्हा जारी करण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने नुकतेच जाहीर केले होते की ज्या मतदारांना डुप्लिकेट ईपीआयसी क्रमांक देण्यात आले आहेत त्यांना पुढील तीन महिन्यांत नवीन क्रमांक दिले जातील. आयोगाने असेही स्पष्ट केले की समान EPIC क्रमांक असण्याचा अर्थ मतदार बनावट आहेत असा होत नाही, परंतु कोणताही मतदार ज्या मतदारसंघात नोंदणीकृत आहे तेथेच मतदान करू शकतो.





