Amit Shah : “अजित पवारांची तक्रार करू नका, त्यांच्याच मागे लागा” – अमित शहा

Ajit Pawar | Amit Shah – अजित पवार यांची तक्रार घेऊन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याकडे गेलेल्या भाजपच्या आमदारांना शहा यांनी वेगळाच सल्ला दिला आहे.
अजित पवार यांची तक्रार करू नका, उलट त्यांच्यामागे तसेच इतर सर्वच मंत्र्यांच्या मागे कामासाठी तगादा लावा. त्यामुळे अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे, अशा शब्दात अमित शहा यांनी भाजप आमदारांना सूचना केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेचा लाभ घेत स्वत:चा पक्ष मजबूत करत आहेत. तो त्यांचा अधिकार असला तरी ते भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर कुरघोडी साठी आपल्या पदाधिकाऱ्यांना ताकद देत आहेत.
ही बाब गंभीर असल्याने त्यांच्या कुरघोड्यांना रोखा, असे साकडे भाजपच्या काही आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना घातले आहे. त्याची दखल घेऊन शाह यांनी मुंबईत अजित पवारांशी सह्याद्री विश्रामगृहावर चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आपल्या आमदारांची संख्या अधिक
आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करायची आहे. त्यामुळे महायुती म्हणून सर्वांना सोबत घेऊन काम करायला हवे. आपल्या आमदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कामासाठी त्यांच्यामागे तगादा लावा.
त्यामुळे तेच तक्रार घेऊन माझ्याकडे आले पाहिजे, असा कानमंत्र अमित शहा यांनी सर्व आमदारांना दिला आहे. आपल्या आमदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मागे हटू नका, प्रशासन आणि सरकारी पातळीवर आक्रमकपणे कामाचा पाठपुरावा करा. असा सल्ला देखील त्यांनी आमदारांना दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणनीती
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. शहा यांनी विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई अशा तीन विभागांना भेटी देऊन,
तेथील नेते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणनीती नेमकी कशी असली पाहिजे, या विषयी काही नेत्यांशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तेव्हा काही नेत्यांनी, आमदारांनी संधी साधून अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती.





