मुंबईकरांनो गाफील राहू नका.! करोना पुन्हा वाढतोय, शहरात दिवसभरात तब्बल….

मुंबई – ‘करोना’ या तीन अक्षरी शब्दांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी जगभरात मोठा धुमाकुळ घातला होता. जगात करोनाची कोट्यावधी लोकांना लागण झाली. तर करोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचं आपण पाहिलं आहे. दरम्यान, अश्यातच आता करोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
देभरात झपाटय़ाने वाढणाऱया ‘एच3एन2’ने इन्फ्लुएन्झा टेन्शन वाढवलेले असताना आता मुंबईत करोना रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी 10 ते 20 पर्यंत स्थिरावलेली बाधितांची संख्या गेल्या चार दिवसांपासून 30 पर्यंत नोंद होत आहे. तर आज दिवसभरात केलेल्या 1377 चाचण्यांमध्ये तब्बल 71 करोनाबाधित आढळल्याने खबरदारी घेण्याची गरज आहे.
आज दिवसभरात करोना बाधित 71 रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांची एकूण संख्या 11 लाख 55 हजार 774 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 25 रुग्णांनी करोनावर मात केल्याने आतापर्यंत 11 लाख 35 हजार 781 रुग्णांनी करोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 246 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तर, दुसरीकडे नागरिकांना काळजी घेण्याचे देखील आव्हान देखील केलं आहे.
दरम्यान, बाहेर फिरताना काळजी घ्या, शक्यतो मास्क लावूनच फिरा किंवा ज्यांना खोकला असेल अशा रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. नुकतंच विधान भवन येथे एच3एन2 आजारा विषयीची आरोग्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सतर्कतेचा इशारा दिला.





