मूर्ती दान करा किंवा कृत्रिम हौदातच विसर्जित करा; मूर्ती, निर्माल्य संकलनासाठी केंद्रसंख्या वाढवली

पुणे – पर्यावरणपूरक गणेशोत्सवातील एक पाऊल म्हणून गणेशमूर्तींचे विसर्जन यंदाही नदीत करण्यात मनाई करण्यात आली आहे. तर, यावर पर्याय म्हणून पालिकेने कृत्रिम हौद, मूर्तीसंकलन केंद्र तसेच निर्माल्य संकलन केंद्रांची संख्या लक्षणीय वाढवली आहे.जास्तीत जास्त नागारिकांनी पाण्याच्या टाक्यांमध्ये विसर्जन करावे. तसेच मूर्ती संकलन केंद्रात मूर्ती द्यावी, यासाठी पालिकेकडून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जनजागृतीही केली जाणार आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच सर्वोच्च न्यायालयानेही “पीओपी’ अर्थात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी घातली असून, जलस्रोतांमध्ये त्यांचे विसर्जन करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे पुणेकरांनी नदीपात्र, तलाव, विहिरी तसेच इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनास मानाई केली आहे. वर्ष 2022 मध्ये गणेशोत्सव काळात महापालिकेने क्षेत्रीय कार्यलयांतर्गत 359 लोखंडी टाक्या उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यात सुमारे 209 टाक्यांची वाढ केली असून ही संख्या आता 568 असणार आहे.
तर, मूर्ती संकलन केंद्रांची संख्या गतवर्षी 216 होती. ती यंदा 252 असेल. तर मागील वर्षी गणेशोत्सवाच्या निर्माल्य संकलनासाठी 206 कंटेनर होते. ही संख्या यंदा 256 असेल. 22 प्रमुख घाटांवर सुमारे 42 बांधीव पाण्याचे हौद असून, तेथेदेखील मूर्ती विसर्जन करता येणार आहे.
महापालिकेने यावर्षीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव विसर्जनासाठी नियोजन केले आहे. त्यासाठी टाक्या, मूर्तीसंकलन केंद्र व निर्माल्य संकलनावर भर देण्यात आला आहे. यंदाही संकलित निर्माल्यापासून खत करून शेतकरी तसेच नागरिकांना मोफत वाटप केले जाणार आहे. – आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग





