Domestic Violence : खाकी वर्दीलाही सासरचा जाच! महिला पोलीस अंमलदाराचा सासरकडून छळ; 6 जणांवर गुन्हा
Domestic Violence : पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत महिला अंमलदाराची पतीसह ६ जणांविरुद्ध तक्रार; लग्नात हुंडा देऊनही छळ केल्याचा आरोप.

Domestic Violence – दुसऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या एका महिला पोलीस अंमलदारालाच सासरच्या जाचाला सामोरे जावे लागले. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला अंमलदार यांनी सासू, पतीसह सासरच्या 6 जणांविरुद्ध छळ आणि मारहाणीची तक्रार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिली आहे.
प्रियंका शिवकुमार खबाले (वय 25, रा. सध्या रा. शिंदवणे ता. हवेली, मुळ रा. रांझणी, जि. सोलापूर), असे महिला अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी खबाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती शिवकुमार श्यामराव खबाले, सासू शोभा शामराव खबाले, सासरे श्यामराव खबाले, ननंद लक्ष्मी खबाले, दीरअमर खबाले, दीर मंगेश खबाले, (सर्व रा. कळंब, जि. धाराशिव), अशी गुन्हा दाखल केलेल्या सासरकडील मंडळींची नावे आहेत.
प्रियंका यांचा विवाह डिसेंबर 2021 मध्ये कळंब (जि. धाराशिव) येथील शिवकुमार खबाले याच्याशी झाला होता. लग्नाच्या वेळी प्रियंका यांच्या कुटुंबीयांनी 5 तोळे सोने, 4 लाख रोख आणि 5 लाखांचे प्रापंचिक साहित्य दिले होते. लग्नानंतर काही महिने सुखात गेल्यानंतर प्रियंका आजारी पडल्या असता, सासरच्यांनी त्यांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले. “तुझ्या आई-वडिलांकडे जाऊन उपचार कर,” असे म्हणत त्यांना माहेरी पाठवून दिले.
प्रियंका यांनी पुढील शिक्षणासाठी संगणक क्लास लावल्यानंतर सासरच्या मंडळींनी त्यांना घरात कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. क्लासला जाऊ नये म्हणून त्यांना घरातील कामाचा बोजा दिला जात होता. तरीही प्रियंका यांनी पोलीस भरतीची तयारी सुरू केली. 15 मे 2022 रोजी त्यांनी पोलीस भरतीची ॲकॅडमी लावली. त्यांच्या पतीने दारू पिऊन तिथे येत “भरती झालीस तर तुला नांदवणार नाही,” अशी धमकी दिली होती.
प्रियंका 29 मे 2023 रोजी पोलीस दलात भरती झाल्या. ट्रेनिंग पूर्ण करून कर्तव्यावर रुजू झाल्यानंतरही सासरच्यांकडून त्यांचा छळ सुरूच होता. प्रियंका त्यांच्या पगारातून घरातील खर्च चालवत होत्या, तरीही पती आणि सासरच्या मंडळींनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण केली. डिसेंबर 2025 मध्ये त्यांना घराबाहेर काढले.
सध्या प्रियंका या शिंदवणे येथे भाड्याच्या खोलीत एकट्याच राहत आहेत. तिथे आल्यावरही पतीने तीन वेळा त्यांना मारहाण केली. सासरच्या लोकांच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर प्रियंका यांनी तक्रार दिली आहे. पुढील तपास गौरी क्षीरसागर करीत आहेत.






