Ambadas Danave : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची ताकद मुख्यमंत्र्यांमध्ये नाही का? : अंबादास दानवेंचा सवाल

पुणेः बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. या हत्या प्रकरणात आतापर्यंत ८ आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. मात्र, या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
हे हत्या प्रकरण लावून धरलेले आष्टीचे आमदार सुरेश धस हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी हे प्रकरण फास्टट्रक कोर्टात चालवावे आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली माध्यमांना प्रतिक्रिया देताना केली. यानंतर आता उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्स अंकाउटवरून संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने पूर्व झाले असून किती काळ कळ सोसायची देशमुख कुटुंबीयांनी असा प्रश्न सरकारला केला आहे. तसेच या हत्या प्रकरणातील तपासावर संशय व्यक्त करत त्यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. कृष्णा आंधळे हा आरोपी अजून धरला गेलेला नाही. त्याच्या मुसक्या कधी अवळणार? असा सवाल करत दरदिवशी नवे घोटाळे समोर येत असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेणार? की ती ताकद मुख्यमंत्र्यांच्या बाहुत नाही, अशी खोचक टीका दानवे यांनी केली आहे.
अनेक प्रश्न केले उपस्थित
आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना परत सीआयडीने आपल्या कोठडीत घेऊन तपास चालवला होता. त्यात काय डेटा रिकव्हर झाला ते लोकांना कधी कळणार? विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी समोर आली होती. त्यांच्या या नियुक्तीचे चार ओळींचे पत्र काढायला सरकारला अजून किती महिने लागणार? धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे उभ्या जगाला ज्ञात आहे. मग यांच्या संबंधांची तपासणी कधी होणार? दरदिवशी नवे घोटाळे समोर येत असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेणार? की ती ताकद मुख्यमंत्र्यांच्या बाहुत नाही? असे दानवेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कपालेश्वर मंदिरात मी स्वतःसाठी नाही तर….
आमदार सुरेश धस हे नाशिक दौऱ्यावर आहेत. देशमुख यांच्या हत्येला आज दोन महिने पूर्ण झाले असून याबाबत धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मी देवाकडे कधीच काही मागत नाही. कपालेश्वर मंदिरात मी स्वतःसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनता सुखी राहावी ही प्रार्थना केली. आमच्या बीड जिल्ह्यासारखे होऊ नये अशी अपेक्षा आहे. संतोष देशमुख प्रकरणात लवकरात लवकर चार्टशीट दाखल व्हावी. हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालावावे आणि सगळे आरोपी फासावर जावे अशी प्रार्थना देवाच्या चरणी केली आहे, अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली.





