Pune District : पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांचा पुढाकार
Pune District : जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि नारायणगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गणपीर बाबा टेकडी येथे आयोजित ’एक डॉक्टर, एक झाड’ या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

नारायणगाव : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासाठी वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांनी केले. जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि नारायणगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गणपीर बाबा टेकडी येथे आयोजित ’एक डॉक्टर, एक झाड’ या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
या उपक्रमाअंतर्गत गणपीर बाबा टेकडीवर 550 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, वनाधिकारी प्रदीप चव्हाण, डॉ. संदीप डोळे, डॉ. प्रशांत काचळे, डॉ. प्रदीप जोशी, डॉ. गुळवे, डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. अनुष्का शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी सचिन उंडे, आरिफ आत्तार, जंगल कोल्हे, विकास तोडकरी, अजित वाजगे, महिला डॉक्टर, वन विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योगेश पाटे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून याच टेकडीवर आंबा, वड, पिंपळ, जांभूळ आदी देशी प्रजातींच्या एकूण 1,800 वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही ग्रामपंचायत स्वीकारणार आहे. प्रत्येक वृक्षाच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून वृक्षलागवड ही केवळ औपचारिकता न राहता ती संवर्धनाची चळवळ बनविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सरपंच होण्यापूर्वीपासूनच वृक्षलागवडीचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे सांगताना त्यांनी यंदा शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात प्रथमच 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाल्याची बाब चिंताजनक असल्याचे नमूद केले. जुन्नर तालुका पर्यावरण तालुका म्हणून घोषित झाला असला तरी केवळ वृक्ष लावून उपयोग नाही, ती जगविण्याची सामूहिक जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी डॉ. प्रदीप जोशी, डॉ. प्रशांत काचळे, डॉ. संदीप डोळे, माऊली खंडागळे आणि वनाधिकारी प्रदीप चव्हाण यांनीही पर्यावरण संवर्धनासाठी देशी वृक्षांची लागवड व त्यांचे संगोपन अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार अजित वाजगे यांनी मानले.





