बडतर्फ IAS पूजा खेडकर प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट; अपंगाच्या दाखल्याबाबत ‘ती’ माहिती आली समोर

पुणे : मागच्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर UPSC कडून नुकतीच मोठी कारवाई करण्यात आली. UPSC कडून पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली तसेच यापुढे यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, असंही यूपीएससीकडून स्पष्ट करण्यात आलं. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून मिळवलेला अपंगत्वाचा दाखला खरा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अपंगत्वाचा दाखला खरा असल्याचा दावा
वादग्रस्त बडतर्फ आयएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून मिळवलेला अपंगत्वाचा दाखला खरा असून , सर्व तांत्रिक बाबी पडताळून आणि नियमानुसारच तो दिला गेला आहे. दाखल्या संदर्भात करण्यात आलेल्या चौकशीमध्ये वायसीएम सर्व कर्मचारी निर्दोष असल्याचा खुलासा करत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयकडे पाठवला आहे. पूजा खेडकर यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यात 7 टक्के अपंगत्व असल्याचा दाखला त्यांना देण्यात आला होता, मात्र वायसीएमकडून देण्यात आलेल्या दाखल्याचा कोणत्याही शासकीय किंवा खासगी संस्थेच्या नोकरीसाठी उपयोग होऊ शकत नाही ,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकाडून होणार तपासणी
डॉक्टर वाबळे यांनी पूजा खेडकर यांना अपंगत्व दाखला देण्याआधी कोणकोणत्या शारीरिक तपासण्या करण्यात आल्या होत्या आणि त्या योग्य तज्ज्ञाकडून केल्या गेल्या होत्या का? या संदर्भात दिलेल्या माहितीची पुन्हा एकदा जिल्हा शल्य चिकित्सकाडून तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.





