“तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना?” उबाठाच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल, केली ‘ही’ मोठी मागणी

Ambadas Danve : पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणामुळे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे चित्र दिसत आहे. १८०० कोटी रुपयांचे बाजारभाव असलेली जमीन ३०० कोटी रुपयांना खरेदी करून यासाठी केवळ ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले, असा आरोप होत आहे.
जमीन घोटाळाप्रकरणावरून पार्थ पवार यांच्यावर आरोपांची राळ उठवली जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. बावधन पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिग्विजय पाटील, शितल तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मुद्रांक विभागाला सात दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पार्थ पवार यांची सही असलेला एक कागदपत्राचा फोटो फेसबुक पोस्ट करून शेअर करत पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापासून वाचवण्याचा मुंद्रांक विभाग आणि पोलिस प्रयत्न करत आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणावरून उबाठा गटाच्या नेते अंबादास दानवे यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पार्थ पवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माझ्याशी दुरान्वये संबंध नाही असे ते म्हणाले होते. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर अंबादास दानवे यांनी तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? असा सवाल केला आहे.
हेही वाचा : पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण : पार्थ पवारांची त्या दस्तावर सही? सुषमा अंधारेंनी पुरावाच दाखवला
अंबादास दानवे यांचे ट्वीट
“मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही. आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत. तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे, खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्या”
मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही… आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत..
तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना?
बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे, खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून…
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 7, 2025
अजित पवारांची प्रतिक्रिया
तीन ते चार महिन्यांपूर्वी अशा पद्धतीचं काहीतरी सुरु असल्याचं माझ्या कानावर आलं होतं. तेव्हा मी असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असं सांगितलं होतं. कोणत्याही चुकीच्या गोष्टी कोणीही करु नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिल्या होत्या. त्यानंतर परत काय झालं मला माहिती नाही. आता वेगवेगळ्या जमिनीबद्दल बरंच काही सांगितलं जातं. त्याची इत्यंभूत माहिती घेणार आहे की कोणती कागदपत्रं आहेत कोणती नाही, कोणी परवानगी दिली, कोणी नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.





