Pune : अनाथ मुलींसोबत दिवाळी अन् भाऊबीज; मगराज राठी परिवाराचा १९९६ पासून मदतीचा हात
Pune : पुरंदरमधील ममता बालसदनमध्ये फराळ, नवीन कपडे आणि भेटवस्तूंचे वाटप; जानवी सपकाळने व्यक्त केल्या भावनिक आठवणी

Pune : सणांचा आनंद समाजातील गरजू आणि वंचित घटकांसोबत वाटून घेण्यातच खरा आनंद असतो. याच भावनेतून महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सीईओ मगराज राठी यांच्या पुढाकाराने पुरंदर तालुक्यातील ममता बालसदनमधील मुलींसोबत दिवाळी आणि भाऊबीज साजरी करण्यात आली.
या वेळी संस्थेतील मुलांना दिवाळी फराळ, मिठाई, नवीन कपडे आणि भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच फुलबाज्या आणि मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे मुलांनी दिवाळीचा आनंद घेतला. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाने उपस्थितांनाही समाधान मिळाले.
ममता बालसदन संस्थेच्या सुरुवातीच्या काळापासून, सिंधुताई सपकाळ यांच्या कार्यकाळापासून मगराज राठी परिवार संस्थेला आर्थिक मदत करत आहे. तसेच दरवर्षी दिवाळी आणि संक्रांतीचे सण मुलांसोबत साजरे केले जातात, अशी माहिती दीपक गायकवाड यांनी दिली.
या वेळी राघव राठी, विक्रम सारडा आणि सचिन डागा उपस्थित होते.
मदतीच्या आठवणींनी जानवी भावूक
ममता बालसदनमधील जानवी सपकाळ हिने राठी परिवाराविषयीच्या आठवणी सांगितल्या. ती म्हणाली, “मी अवघ्या सात दिवसांची असताना या संस्थेत आले. तेव्हापासून माझी दिवाळी आणि वाढदिवस मगराज राठी आमच्या संस्थेत येऊन साजरा करतात. लहानपणी मला कुरकुरे आवडायचे. त्यामुळे ते आले की मी कुरकुरे आणले का, असे विचारायचे. आज मी बारावीत शिकत आहे. राठी यांच्यासारख्या व्यक्तींनी संस्थेला दिलेल्या आधारामुळे माझे आयुष्य घडण्यास मदत झाली.” हे सांगताना जानवी भावूक झाली.
मगराज राठी म्हणाले…
“दिवाळीचा खरा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता अनाथ आणि वंचित मुलांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरवण्यात आहे. ममता बालसदनला आर्थिक मदत करण्यासोबतच मुलांसोबत दिवाळी आणि संक्रांत साजरी करण्याचा उपक्रम आम्ही सातत्याने राबवत आहोत. समाजातील गरजूंच्या आनंदासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती आणि संस्थांनी पुढे यावे,” असे आवाहन मगराज राठी यांनी केले.





