Satara | राजकीय फायद्यासाठी विशिष्ट समूह जिल्हा बॅंक चालवतो

सातारा, (प्रतिनिधी) – स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी काही लोकांचा एक विशिष्ट समूह जिल्हा बॅंक चालवत आहे. शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेत किती मानाचे स्थान आहे किंवा शेतकऱ्यांना बॅंक आपली वाटते का ? असे प्रश्न प्रकर्षाने उपस्थित होत आहेत.
बॅंकेतील नोकरभरती सर्वसामान्यांसाठी नसून संचालक आणि पदाधिकाऱ्यांच्या भल्यासाठी असल्याचा घणाघात आ. जयकुमार यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना आ. गोरे पुढे म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक खरे तर शेतकऱ्यांची बॅंक आहे. मात्र, अलिकडे ही बॅंक विशिष्ट लोकांपुरतीच मर्यादित राहिली आहे.
शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेताना त्याला राजकीय रंग देणे नेहमीचेच झाले आहे. जे शेतकरी त्या विशिष्ट लोकांकाच्या समूहाबरोबर आहेत त्यांचीच बॅंकेतील कामे केली जातात.
अशाच लोकांना आण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज दिले जाते. ज्यांचा राजकारणाशी किंवा बॅंकेतील ठराविक लोकांशी संबंध नाही अशा सर्वसामान्य मराठा युवकांना कर्ज वाटप झाले नाही.
बॅंक शेतकऱ्यांची असली तरी अशा कारभारामुळे ती शेतकऱ्यांना आपली वाटत नाही. ठराविक लोकांचा समूह बॅंकेचा कारभार स्वत:च्या राजकीय आणि इतर फायद्यासाठी चालवत आहे.
बॅंक चांगली असणे, फायद्यात असणे हा एकमेव निकष होवू शकत नाही. नफा तर व्यापारी आणि व्याजाने पैसे देणारा प्रत्येकजण कमवतो. नफ्यात आहे म्हणून बॅंकेने ढोल बडवायचे कारण नाही. त्या नफ्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे.
बॅंकेत सुरु असणारी नोकरभरतीची प्रक्रिया सर्वसामान्यांसाठी नसून संचालकांच्या भल्यासाठी आहे. संचालकांचे राजकारण टिकविण्यासाठी नोकरभरती आहे.
सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पात्र मुला, मुलींसाठी नोकरभरती नाही. उपाध्यक्षांसह संचालक गावागावात शेकडो लोकांना जिल्हा बॅंकेत नोकरी लावण्याचे आश्वासन देत आहेत.
राजकीय बैठकांना कर्जदारांना दबाव टाकून बोलवले जात आहे. सचिवांवर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे.
आ. गोरे पुढे म्हणाले, आमच्या सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान दिले. बहुतांशी लोकांना ते मिळालेही, मात्र जिल्हा बॅंकेने जे त्यांच्या राजकीय पक्षाचे नाहीत त्यांना वगळले आहे.
हे बॅंक आणि सोसायट्यांनी केलेले पाप आहे. ते पाप शेतकऱ्यांच्या माथी मारले जावू नये. याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. ज्यांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान मिळाले नाही त्यांना ते मिळावी अशी मागणी केली आहे.





