District Bank Election Results : सातारा, सांगली आणि अहिल्यानगर जिल्हा बँकेचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात
District Bank Election Results : दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

District Bank Election Results : सातारा, सांगली आणि अहिल्यानगर या तीन ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या 10 जागांसाठी, तर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या उर्वरित 6 जागांसाठी आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण 21 पैकी उर्वरित 12 जागांचा आज निकाल लागणार आहे.
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
साताऱ्यात याआधी 9 जागा बिनविरोध झाल्या आहेत. परिणामी या निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील अकरा तालुक्यांत मतदान प्रक्रिया पडली.
अत्यंत चुरशीच्या लढतीत जिल्ह्यातील एकूण 2,021 मतदारांपैकी 1,979 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने विक्रमी 97.92 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये लढत झाली आहे.
साताऱ्यातील नागरी बँक असोसिएशनच्या सभागृहात मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ६ टेबलांवर दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण केली जाणार असून दुपारी १ पर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
सांगलीत 21 पैकी 15 जागा आधीच बिनविरोध झाल्या असून, उर्वरित जागांवर अत्यंत प्रतिष्ठेच्या लढती पाहायला मिळाल्या. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या उर्वरित 6 जागांसाठी रविवारी अत्यंत चुरशीने विक्रमी 93.91 टक्के मतदान पार पडले.
आता 13 उमेदवारांचे भवितव्य आणि मतदारांच्या कौल नेमका कोणाला, याचा फैसला आज होणार आहे. मात्र आज निकाला आधीच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जिल्हा बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन चे फलक सांगलीत झळकले आहेत.
येथे जत सोसायटी गटमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध काँग्रेसचे विनोद पवार होते. तर तासगाव गटमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील विरुद्ध माजी आमदार सुमन पाटील यांच्यात लढत झालीय असून आमदार रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तर कवठेमहांकाळ गटमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे विरुद्ध टी. व्ही. पाटील तर मिरज गटमध्ये अण्णासाहेब कोरे विरुद्ध भाजपचे अनिल शेगुणशे यांच्यात सामना रंगला.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूकची रंगत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि खासदार निलेश लंके यांच्या सक्रिय सहभागामुळे अधिकच वाढली. संचालकपदाच्या २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्या, तर उर्वरित १० जागांसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत ३ हजार ८३७ मतदारांपैकी तब्बल ९९.२८ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची राजकीय समीकरणे चर्चेत आली.
विखे-थोरात यांची कथित राजकीय जवळीक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे सुरुवातीपासूनच ही निवडणूक चर्चेत राहिली. आता आज जाहीर होणाऱ्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:





