Sonalee Kulkarni : सावळ्या रंगावरून हिणवलं, मोठ्या संघर्षातून नाव कमावलं; सोनाली कुलकर्णीचे सुरुवातीचे दिवस
Sonalee Kulkarni : कारकिर्दीच्या सुरुवातीला सोनालीला सावळ्या रंगावरुन अपमानास्पद बोलणे ऐकावे लागले होते.

Sonalee Kulkarni : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज (३ नोव्हेंबर) आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही अभिनेत्रीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. कारकिर्दीच्या सुरुवातीला सोनालीला सावळ्या रंगावरुन अपमानास्पद बोलणे ऐकावे लागले होते.
सोनाली कुलकर्णीचा जन्म ३ नोव्हेंबर १९७४ रोजी पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लहानपणापासूनच तिच्या वाट्याला संघर्षाचे दिवसे आले. एका मुलाखतीत तिने आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या. या आठवणीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिची आई डबे तयार करून देत असत तसेच चटणी विकण्याचे कामही करत असे. या कामात सोनालीदेखील आईला मदत करत असायची.
सावळ्या रंगामुळे ऐकावे लागले अपमानास्पद बोल
अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवताना सोनालीला रंगभेदाचाही सामना करावा लागला. एका मुलाखतीत ऑडिशनदरम्यान आलेला कटू अनुभव तिने शेअर केला होता. पहिल्या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी सोनाली गेली असताना पुण्यातील एका महिलेने तिच्या दिसण्यावरून टोमणा मारला. ‘कधीतरी आरशात स्वतःला पाहा. सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाहीत,’ अशा शब्दांत त्या महिलेने सोनालीचा अपमान केला होता. मात्र, या अनुभवामुळे खचून न जाता तिने मेहनतीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले.
कन्नड चित्रपटातून अभिनयाची सुरुवात
सोनालीने १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चेलुवी’ या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर १९९४ मध्ये ‘मुक्ता’ या मराठी चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. पुढे ‘दोघी’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘कच्चा लिंबू’ आणि ‘गुलाबजाम’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. मराठी चित्रपटसृष्टीत या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाची स्वतंत्र छाप पाडली. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे.
बॉलिवूडमधील सुपरस्टार्ससोबत केले काम
मराठी चित्रपटांमध्ये नाव कमावल्यानंतर सोनालीने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली. आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘दिल चाहता है’ या २००१ मधील चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख मिळाली. त्यानंतर ‘मिशन काश्मीर’ आणि ‘टॅक्सी नंबर ९२११’ यांसारख्या चित्रपटांतून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.





