Dalai Lama : दलाई लामा यांना भारतरत्न देण्याची चर्चा; कोणी केली मागणी? पाहा…

Bharat Ratna | Dalai Lama – तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची बातमी आहे. भारतीय खासदारांच्या ऑल पार्टी फोरमने दलाई लामा यांना भारतरत्न देण्याचा सल्ला दिला आहे.
इतकेच नाही तर ८० खासदारांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. लवकरच हा प्रस्ताव पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींकडे पाठवला जाऊ शकतो असे मानले जाते आहे.
दरम्यान, दलाई लामा भारताचे नागरिक नाहीत त्यामुळे त्यांना भारतरत्न किताब कसा दिला जाउ शकतो अशी चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दलाई लामा हे १९५९ पासून तिबेटमधून निर्वासित नागरिक म्हणून भारतात राहत असले तरी त्यांनी अद्याप भारतीय नागरिकत्व घेतलेले नाही.
चीनने तिबेटवर कब्जा केल्यानंतर, दलाई लामा त्यांच्या हजारो समर्थकांसह भारतात आले. यानंतर, त्यांनी धर्मशाळा आपले मुख्यालय बनवले. त्यांचे निर्वासित सरकार देखील येथूनच चालते.
भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्याच्या नावाप्रमाणेच, हा पुरस्कार फक्त भारतीय नागरिकांना दिला जातो. तथापि, काही अपवाद आहेत. प्रत्यक्षात, आतापर्यंत तीन परदेशी नागरिकांना भारतरत्न देण्यात आले आहे.
हा पुरस्कार पाकिस्तानी नागरिक खान अब्दुल गफ्फार खान, नेल्सन मंडेला आणि मदर तेरेसा यांना देण्यात आला आहे. तथापि, मदर तेरेसा यांनी नंतर भारतीय नागरिकत्व स्वीकारले होते.





