राज्या-राज्यांत भेदभाव ! अर्थसंकल्पावरून राज्यसभेत गदारोळ; विरोधकांनी केला सभात्याग

Budget 2024 । Rajya Sabha – मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी (२३ जुलै) लोकसभेत सादर करण्यात आला. त्यानंतर लोकसभा व राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील खासदार अर्थसंकल्पावरील आपापली मतं मांडत आहेत.
लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला लोकसभेच्या अध्यक्षांकडून (ओम बिर्ला) सभागृहात ४ तास बोलण्याची परवानगी मिळाली. लोकसभेत काँग्रेस खासदार आक्रमक झालेले असताना राज्यसभेतही काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेनेचा ठाकरे गट, तृणूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षांमधील खासदारांनी सरकारवर भेदभावाचे आरोप केल्यानंतर सत्ताधारी खासदारांनी देखील प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ झाला. परिणामी विरोधी पक्षांमधील खासदार सभागृहातून बाहेर पडले.
दोन्ही सभागृहातील खासदारांनी संसदेच्या बाहेर जाऊन सरकारविरोधात घोषणा दिल्या. कॉंग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
गौरव गोगोई म्हणाले, संपूर्ण देश अर्थसंकल्पावर नाराज आहे. सर्व राज्यातील जनता नाराज आहे. कारण भाजप त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. या अर्थसंकल्पात सरकारची मजबुरी स्पष्टपणे दिसत आहे.तसेच बिहार आणि आंध्र प्रदेशला दिलेल्या निधीवरूनही त्यांनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली.
विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. एका बाजूला विरोधक आक्रमक झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.
या बैठकीत सरकारच्या पुढील रणनीतीवर चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, दोन्ही सभागृहातील गोंधळानंतर काही वेळाने लोकसभा व राज्यसभेचे कामकाज सुरू झाले आहे. संसदेच्या आवारात घोषणाबाजी केल्यानंतर विरोधी पक्षांमधील खासदार सभागृहात परतले. मात्र त्यांनी सरकारवर भेदभावाचा आरोप केला आहे.





